सामूहिक बलात्कार प्रकरण; रिक्षेत,जंगलात,लॉजवर,रेल्वे कार्यालयात नेऊन पीडितेवर अत्याचार  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  पुण्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे.या प्रकरणात एकूण 13 आरोपी सहभागी असून त्यांनी पीडित मुलीवर जंगलात,निर्जनस्थळी,रिक्षेमध्ये, लॉज मध्ये आणि रेल्वेच्या कार्यालयात घेऊन जात बलात्कार केला.पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून आणखी पाच आरोपींचा शोध सुरू आहे.त्यातील आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
				  													
						
																							
									  
	 
	पोलिसांनी आतापर्यंत मशाक अब्दुलमजीद कान्याल (वय 27,रा. हडपसर),अकबर उमर शेख (वय 32, रा. जुना बाजार),रफिक मुर्तजा शेख (वय 32),अझरूद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (वय 27), प्रशांत सॅमियल गायकवाड (वय 32),राजकुमार रामनगिना प्रसाद (वय 29),नोईब नईम खान (वय 24), असिफ फिरोज पठाण (वय 36) या आठ जणांना अटक केली आहे.
				  				  
	 
	याप्रकरणी अधिक माहिती अशी की,14 वर्षे वयाची ही मुलगी 31 ऑगस्ट रोजी मित्राला भेटण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात गेली होती. यादरम्यान आरोपींनी तिला रात्र झाली असून घरी सोडण्याचा बहाणा करत रिक्षात बसून तिचे अपहरण केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.दरम्यान रात्र झाली तरी मुलगी घरी परत न आल्याने तिच्या वडिलांनी दुसर्या दिवशी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	तपास सुरू असताना पोलिसांना पीडित मुलगी चंदीगड येथे असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर पोलिसांनी रविवारी सायंकाळी तिला परत पुण्यात आणले.विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली असता तिने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले.त्यानंतर एकच खळबळ उडाली.पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या मदतीने एका रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
				  																								
											
									  
	 
	त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच आठ आरोपींना अटक केली.त्यांना न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.