सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (09:03 IST)

हॅलो. मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन प्रकरण संपवून टाक !,शरद पवारांचा आवाज काढून खंडणी मागणाऱ्यावर FIR

हॅलो… मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन प्रकरण संपवून टाक असे म्हणून पैशांची मागणी केली. कोणत्यातरी वेबसाईटचा वापर करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हुबेहुब आवाज काढून खंडणी  मागितल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकणमध्ये  उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात  एकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार चाकणमध्ये जानेवारी ते 9 ऑगस्ट 2021 या दरम्यान घडला आहे.
 
याप्रकरणात धीरजा धनाजी पठारे (रा. यशवंत नगर खराडी, पुणे) आणि त्याच्या साथिदारांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रतापराव वामन खांडेभराड  (वय-54 रा. कडाचीवाडी ता. खेड, जि. पुणे) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खांडेभराड यांनी आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाच्या पैशासाठी आरोपींनी खांडेभराड यांच्या मागे तगादा लावला होता. तसेच आरोपींनी धमकी दिली. आरोपी हा 30 मे 2021 रोजी फिर्यादीच्या घरी आला.त्याने व्याजाचे पाच कोटी रुपयांची मागणी करत धमकी देत खंडणी मागितली. तसेच पैसे दिले नाहीत माझ्याशी गाठ आहे. मी तुम्हाला बघून घेईन, तुम्हा दोघांना जिवंत सोडणार नाही, कोणत्याही प्रकारे संपवून टाकेन अशी धमकी आरोपीने दिली.
 
आरोपीने 9 ऑगस्ट रोजी कोणत्यातरी वेबसाईचा वापर करुन अज्ञात व्यक्तीला खांडेभराड यांना फोन केला.अज्ञात व्यक्तीने हॅलो, मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन प्रकरण संपवून टाक, असे म्हणत आरोपीने शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करुन फिर्यादीकडे खंडणी मागितली. याप्रकरणी आरोपी व त्याच्या साथिदारांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगणकाचा वापर करुन फिर्यादीला कॉल केला. यात आरोपींच्या फोन नंबर ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबई येथील घरातील फोन नंबर दिसत होता. इंटरनेटद्वारे असा खोटा कॉल करुन आरोपींनी आवाजाची नक्कल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.