1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Husband and in-laws arrest in Payal Zambre suicide case

दर दिवाळीला माहेरून १० तोळे सोने आणण्याचा दबाव! पायल झांबरे आत्महत्येप्रकरणी पतीसह सासू-सासरे अखेर गजाआड

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील सून पायल अक्षय झांबरे (वय ३५) यांच्या संशयास्पद मृत्यू आणि आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी पती अक्षय झांबरेसह सासू मंगल झांबरे आणि सासरे अरविंद झांबरे यांना अटक केली आहे.
 
हुंडा आणि पैशांची मागणी
पायल यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नात मोठा खर्च करूनही सासरच्या मंडळींकडून सतत सोने, रोकड आणि महागड्या भेटवस्तूंची मागणी केली जात होती. दरवर्षी दिवाळीला १० तोळे सोने आणण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
 
कौटुंबिक छळ
लग्नानंतर गेल्या काही वर्षांपासून सासरच्या लोकांकडून पायल यांचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. रविवारी सासूसोबत झालेल्या वादानंतर त्या घरातून बाहेर पडल्या होत्या.
 
गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या
सोमवारी सकाळी राहत्या घराजवळील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पायल गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी पाठवलेल्या संदेशात सासूच्या छळाचा उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे.
 
पोलिसांची कारवाई
पायल यांचे भाऊ ऋषिकेश पवार यांच्या तक्रारीवरून स्वारगेट पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडा बंदी कायदा आणि कौटुंबिक छळाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आरोपींना पोलीस कोठडी
पोलिसांनी आधी पती अक्षय झांबरेला अटक केली होती आणि त्यानंतर फरार असलेल्या सासू-सासऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.
पुढील लेख
LIVE: निधी न मिळाल्याने NCP आमदारांमध्ये नाराजी; सुनेत्रा पवारांकडे तक्रार करत दिला पराभवाचा इशारा