शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2024 (09:19 IST)

मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार - वसंत मोरे

पुणे : वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन जवळपास २० दिवसांचा कालावधी होऊन गेला. या संपूर्ण कालावधीत वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.पण वसंत मोरे यांना उमेदवारी नाकारत आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर दुसर्‍या बाजूला महायुती कडून भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वसंत मोरे हे अपक्ष निवडणुक लढणार अशी चर्चा सुरू होती.
 
त्याच दरम्यान वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. त्या सर्व घडामोडी दरम्यान काल रात्री प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता पुणे लोकसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहण्यास मिळणार आहे.
 
त्या उमेदवारी बाबत वसंत मोरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,मागील २५ वर्षापासुन राज ठाकरे यांच्यासोबत काम करत राहिलो. त्या कालावधीत पुणे महापालिकेमध्ये तीन वेळा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने केले. या १५ वर्षाच्या नगरसेवक पदाच्या काळात सत्तेमध्ये नसताना देखील कात्रज प्रभागाचा सर्वांगीण विकास केला आहे. कात्रज प्रभाग हा शहरासमोर रोल मॉडेल ठरल आहे. माझ्याकडून प्रभागात सर्व विकास काम सुरू होती.
 
त्याच दरम्यान राज ठाकरे यांनी पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ती जबाबदारी देखील चोखपणे बजावत, शहरात पक्ष वाढविण्याचे काम केले.त्या माध्यमातुन लोकसभेची तयारी सुरू केली. पण पक्षातील काहींनी राज ठाकरे यांना माझ्याबद्दल निगेटिव्ह रिपोर्ट पाठवले. त्यानंतर अनेक घडामोडी घडत गेल्या आणि त्यानंतर मी अखेर पक्षामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी राज मार्गावर होतो आणि आता राजमार्ग सोडून राजगृहच्या मार्गावर गेलो आहे. पण राज ठाकरे यांच्यापासून दूर गेल्यानंतर मागील १५ दिवस माझ्यासाठी हा कठीण काळ होता अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
 
तसेच ते पुढे म्हणाले की, मला उमेदवारी मिळावी याकरिता महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो. पण मला काही कारणास्तव उमेदवारी मिळाली नाही. मात्र आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी देऊन मला काम करण्याची संधी दिली. याबद्दल मी त्यांचा आभारी असून प्रकाश आंबेडकर यांना समाजातील प्रत्येक घटक मानणारा आहे.
 
त्यामुळे या निवडणुकीत मला अधिकाधिक फायदा होईल आणि मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
 
Edited by Ratnadeep Ranshoor