मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (18:29 IST)

पुण्यातील 4 वर्षांच्या चिमुकलीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड’

पुण्याच्या मंचर येथील एका चिमुकलीने कमाल कामगिरी केली आहे. तिला तब्बल १९० हून अधिक देशांचे ध्वज आणि त्या देशांच्या राजधान्या तोंडपाठ आहेत. ऐवढेच नाही तर केवळ त्या देशाचा ध्वज पाहून ती देश आणि त्याची राजधानी ओळखू शकते. या चिमुकलीचे नाव ईशान्वी आढळराव (Ishanvi Adhalrao) असे असून ती पुण्याच्या मंचर येथे राहते. ईशान्वीने अवघ्या ३ मिनिटे १० सेंकदात १९५ देशांचे ध्वज ओळखले आहेत. केवळ ध्वज ओळखलेच नाही तर ते ध्वज पाहून तिने त्या देशाचे नाव आणि राजधानीचे नाव सांगून जागतिक विक्रम रचला आहे. ईशान्वीच्या अप्रतिम कामगिरीमुळे तिच्या या उपक्रमाची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड या तीन रेकॉर्ड बुकने घेतली आहे. ईशान्वीच्या या रेकॉर्ड ब्रेक कामगिरी तिच्या कुटुंबीय, मित्रमंडळी आणि शाळेसाठी अभिमानास्पद आहे.
 
ईशान्वीच्या या जबरदस्त कामगिरीनंतर तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील ईशान्वीचे कौतुक केले आहे. ‘राज्याचं आणि देशाचं नाव जागतिक पातळीवर झळकवणाऱ्या ईशान्वी या चिमुकलीचं मनःपूर्वक अभिनंदन! अत्यल्प वयात तिने केलेल्या या विक्रमाचा अभिमान वाटतो!’ असे म्हणत रोहित पवार यांनी ट्विट करत ईशान्वीचे कौतुक केले आहे.
 
याआधी देखील जयपूर येथील एका पाच वर्षांच्या मुलीने केवळ ४ मिनिटे १७ सेकंदात १५० देशांचे ध्वज पाहून त्या देशांची नावे आणि त्यांच्या राजधान्या सांगितल्या होत्या. प्रेशा खेमानी असे त्या मुलीचे नाव आहे. प्रेशाला तिच्या या कामगिरीसाठी वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया बुकचा सर्वात कमी वयासाठी लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.