शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (15:32 IST)

भोसरी जमीन घोटाळ्यात खडसेंना दणका;जावई गिरीश चौधरींना ‘ईडी’कडून अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दणका मिळाला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी रात्री गिरीश चौधरींची ईडीकडून कसून चौकशी केल्यानंर त्यांना अटक करण्यात आली. ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.
 
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता.
 
हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल, २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.
 
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असे खडसे यांनी म्हटले होते.
 
एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असे होते का? त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे, माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत, असं खडसे काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते.