शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (15:07 IST)

नारायणगाव बायपासचं काम पूर्ण, पुणे-नाशिक प्रवास होणार सुस्साट

पुणेः केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वात देशभरात रस्ते निर्मितीला चालना मिळून अनेक ठिकाणी वाहतुकीला सुसज्ज असे महामार्ग बनवण्यात येत आहेत. आता पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ताही तयार झाला असून, त्याचे फोटोही नितीन गडकरींनी ट्विटरवर शेअर केलेत. नारायणगावातून जाणारा पुणे बायपास हा पुणे ते नाशिकदरम्यानचा प्रवास सुखकर करेल, असं नितीन गडकरी ट्विट करत म्हणालेत.
 
नेमका कसा आहे नारायणगाव बाह्यवळण मार्ग?
पाच वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्ग नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. तसेच खेड ते सिन्नरदरम्यानच्या नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याचं काम 2016 ला सुरू झाले. सुमारे पाच किलोमीटर लांब आणि साठ मीटर रुंदीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम 2018मध्ये भूसंपादनाच्या कारणास्तव रखडले होते. त्यानंतर आता या बाह्यवळण रस्त्याचं काम पूर्ण झाले असून, पुण्यातून थेट नाशिक आणि मुंबईला पोहोचणे आता सहज शक्य होणार आहे. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.
 
नितीन गडकरींच्या कामाचा वेग हा भन्नाट
नितीन गडकरींच्या कामाचा वेग हा भन्नाट आहे. पायाभूत सुविधांमधील मोठ्या बदलांमुळे भारतातील रस्तेही युरोप आणि अमेरिकेसारखे होतील, असंही गडकरींनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्यही प्रचंड चर्चेत आलं होतं. तसेच दिल्ली-मुंबईमधील रस्त्याचे अंतर फक्त 12 तासांचे होणार असून, राज्यातील समृद्धी महामार्गाने मुंबई-नागपूरमधील अंतरही कमी होईल, असंही त्यांनी सांगितलं होतं.