सोमवार, 28 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified बुधवार, 19 मे 2021 (18:12 IST)

कोरोना लस: नितीन गडकरींनी सुचवला जलद लसनिर्मितीचा नवा मार्ग, मग दिलं स्पष्टीकरण

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं असताना लसीकरण मोहिम संथगतीने सुरू असल्याने अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. देशात लशीची सर्वाधिक गरज असूनही परदेशात निर्यात केल्याने केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
 
या पार्श्वभूमीवर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी लशीचं उत्पादन वेगाने करण्यासाठी मार्ग सुचवले आहेत.
 
देशात लस बनवू शकणाऱ्या इतर कंपन्यांनाही लशीचे परवाने द्यावेत. अशा 10 कंपन्यांना परवाना दिला जाऊ शकतो, असं गडकरी म्हणाले. पुन्हा ट्वीट करून त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की भारत सररकारने हे काम आधीच सुरू केलं आहे. आपल्याला ही गोष्ट माहीत नव्हती असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
 
तसंच हे काम सेवा म्हणून करण्याऐवजी सरकारने त्यांना 10 टक्के रॉयल्टी दिल्यास लसनिर्मितीचं काम वेगाने होऊ शकतं, असं गडकरींनी म्हटलं.
विद्यापीठांच्या कुलपतींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान नितीन गडकरी बोलत होते.
 
यावेळी गडकरी म्हणाले, "मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी असतो, अशावेळी मोठी समस्या निर्माण होते. लसनिर्मिती करणाऱ्या कंपनी 10 कंपन्यांना हे परवान्यांसह काम देऊ शकते. हे काम करत असताना त्यांनी रॉयल्टीही घ्यावी. सेवाभाव म्हणून काम केलं नाही तरी चालेल."
"हाफकिनला ज्याप्रमाणे काम देण्यात आलं, तसंच इतर राज्यांतही करता येऊ शकतं. प्रत्येक राज्यात दोन-तीन प्रयोगशाळा आहेत. त्यांच्याकडे हे काम करण्याची क्षमता आणि यंत्रणाही आहे. लस उत्पादक कंपन्यां आणि त्यांच्यात समन्वय साधण्याची गरज आहे. या प्रयोगशाळांना लशीचा फॉर्म्यूला देऊन लशीचं उत्पादन वाढवलं जाऊ शकतं," गडकरी म्हणाले.
 
"सुरुवातीला देशात पुरवठा करून शिल्लक राहिल्यास परदेशातही लस पाठवली जाऊ शकते. 15 ते 20 दिवसांत हे करणं शक्य आहे," असं गडकरी म्हणाले.
 
तसंच आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीव वाचव शकणाऱ्या औषधांचं आणि लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी आणखीन काही औषध कंपन्यांना मंजुरी देण्यासाठी कायदा बनवण्याचा आग्रह करणार असल्याचंही ते कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
 
गडकरींना पंतप्रधान करण्याबाबत मागणीची पुन्हा चर्चा
काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याची मागणी केली होती.
'पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणं व्यर्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना युद्धाची सूत्रं नितीन गडकरींवर सोपवावी, असं स्वामी म्हणाले होते. तेव्हापासून गडकरी यांना पंतप्रधान करण्याच्या मागणीची चर्चा आहे. देशातील कोरोना स्थिती हाताळण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याचा ठपकाही ठेवला जात आहे.
 
या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देणं नितीन गडकरी यांनी टाळलं होतं. पण आता गडकरी यांनी लसनिर्मितीसाठीचा मार्ग सुचवल्यानंतर पुन्हा या चर्चेने जोर धरल्याचं दिसून येत आहे.