मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (11:16 IST)

मतदार ओळख पटवण्यासाठी 'ही' कागदपत्रे ग्राह्य धरणार

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्र (ईपीआयसी) सादर करू न शकणाऱ्या मतदाराचे आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड आणि पारपत्र आदी नऊ कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत.
 
या कागदपत्रांबरोबरच केंद्र व राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी औद्योगिक घराणे यांनी वितरित केलेले सेवा ओळखपत्र, खासदार किंवा आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर किंवा शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र, विश्वविद्यालयाद्वारे वितरित पदवी किंवा पदविका मूळ प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र ही कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य़ धरण्यात येतील, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
 
छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल, तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित कराव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे किंवा पटवणे शक्य नसल्यास मतदाराला वरील पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील, याची सर्व मतदान केंद्र अध्यक्षांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.