शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 14 मे 2021 (16:04 IST)

आता लसीकरणाची माहिती घरबसल्या मिळणार : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना उद्या कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी संकेतस्थळाचे कार्यान्वित करण्यात आले असून पुणेकरांना लसीकरणा संदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे’ अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
 
लसीकरणासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आता  https://www.punevaccination.in/  या संकेतस्थळावर मिळणार असून याचे लोकार्पण महापौर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुणे महानगरपालिका आणि एमसीसीआयए यांच्या माध्यमातून या डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होते.
 
संकेतस्थळाच्या उद्घाटनानंतर महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कोरोना विषाणूचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन, पुणे महानगरपालिका शहरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करीत आहे. मात्र अनेक लसीकरण केंद्रावर असलेल्या लसीच्या कोट्यापेक्षा नागरिकांची अधिकची गर्दी होते. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तर अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांना घर बसल्या, PMC: Covid-19 Vaccination Drive in Pune city या संकेत स्थळावर आपल्या जवळील लसीकरण केंद्रावर उद्या किती लस उपलब्ध होणार आहे. ही माहिती मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
पुणे शहरासाठी अधिक लसी मिळाव्यात, राज्य सरकारकडे मागणी : महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे शहरात आजपर्यंत पहिला आणि दुसरा डोस मिळून 9 लाख डोस नागरिकांना देण्यात आले आहे. मात्र शहराची लोकसंख्या लक्षात घेता, लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अधिकाधिक पुरवठा करावा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.
 
या कार्यक्रमास सुनिता वाडेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, रुबल अग्रवाल अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), ‘एमसीसीआय’चे प्रशांतजी उपस्थित होते.
 
काय असेल डॅशबोर्डवर?
नागरिकांनी या डॅशबोर्डवर क्लिक केल्यावर त्यांनी वयोगट, लसीचा प्रकार (कोव्हॅॅक्सीन, कोव्हीशिल्ड ) डोसचा प्रकार (पहिला व दुसरा ), लसीकरण केंद्र (सरकारी, खाजगी ) अशे पर्याय क्लिकद्वारे निवडायचे आहेत. त्यानंतर संबधित व्यक्तीला शहरातील सर्व लसीकरण केंद्राची माहती लोकेशनसह उपलब्ध होणार आहे. त्या त्या लसीकरण केंद्रावर क्लिक केल्यास तेथे कुठला लस व डोस उपलब्ध आहे, याचीही माहिती मिळणार आहे.