सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (22:20 IST)

महाराष्ट्र लॉकडाऊन: 18-44 वयोगटाचं लसीकरण स्थगित, लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवला

महाराष्ट्रात 15 मेपर्यंत लावण्यात आलेला लॉकडाऊन आता 31 मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला तूर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहितीही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
 
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही निर्णयांवर एकमत झाले असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.
 
"आज मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीत सर्व मंत्र्यांनी लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात यावी असं म्हटलं. 18 ते 44 वयोगटातलं लसीकरण थांबवण्यात यावं अशी चर्चाही बैठकीत झाली," असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं राजेश टोपे यांनी माध्यमांना सांगितलं. येत्या दोन दिवसात नियमावली जाहीर होईल असंही ते म्हणाले.
 
18 ते 44 वयोगटातील लसीकरण स्थगित
लस उपलब्ध नसल्याने राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्त स्थगित करण्यात येणार असून राज्यातील लॉकडाऊनही 31 मेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली.
 
राजेश टोपे म्हणाले, "राज्य शासनाकडून दोन प्रमुख निर्णय या बैठकीत घेतले आहेत. लस उपलब्ध नसल्याने राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्त स्थगित करण्यात येईल. त्याशिवाय राज्यातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
सध्या राज्यात लस उपलब्ध नसल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करणं शक्य नाही. 45 वर्षांवरील नागरिकांचा दुसरा डोस अद्याप बाकी आहे. कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस दोन महिन्यानंतर तर कोव्हॅक्सीन लशीचा दुसरा डोस एका महिन्यानंतर द्यावा लागतो. दुसरा डोस वेळेत न मिळाल्यास पहिल्या लशीचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे दुसरा डोस देणं अनिवार्यच आहे.
 
त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटासाठी खरेदी केलेली लस 45 वर्षांच्या वरील नागरिकांसाठीच वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास तरी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण राज्यात स्थगित करण्यात आलं आहे.
 
पुरेशी लस उपलब्ध झाल्यानंतर 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाबाबत निर्णय घेण्यात येईल. सध्या प्राधान्य 45 वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणालाच देण्यात येईल. शास्त्रीय नियमानुसार आणि आरोग्याचा विचार करता तेच गरजेचं आहे.
 
31 मेपर्यंत लॉकडाऊन
पुढे राजेश टोपे म्हणाले, "त्याशिवाय दुसरा महत्वाचा विषय म्हणजे लॉकडाऊन. याबाबत सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे. कारण सात लाखांवर पोहोचलेला महाराष्ट्र लॉकडाऊन केल्यानंतर आता चार लाखांवर आलेला आहे.
 
राज्यातील कोरोना रुग्ण लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणात कमी झाले. भारताचा प्रति दिन रुग्णवाढीचं प्रमाण 1.4 आहे. तर महाराष्ट्राचं रुग्णवाढीचं प्रमाण प्रतिदिन 0.8 इतकं आहे. म्हणजेच देशाच्या रुग्णवाढीच्या प्रमाणापेक्षा राज्याचं प्रमाण जवळपास अर्धं आहे.
 
शिवाय इतर पॅरामीटरमध्येही आकडेवारीच्या बाबतीत आपण खाली आलो आहोत. पण याचा अर्थ आपला रुग्णवाढीचा आलेख स्थिर झाला असा होत नाही. तथापि, आपण रुग्णसंख्येत घट होणाऱ्या राज्यांमध्ये नक्कीच आहोत. इतर अनेक राज्य रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा पुढे आहेत. सद्यस्थितीत रुग्णवाढीच्या बाबतीत महाराष्ट्र 30 व्या क्रमांकावर आहे. इतकी या प्रमाणात घट झाली आहे.
 
ते म्हणाले, दुसऱ्या बाजूने म्यूकर मायकोसिस वाढत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहेत. त्यामुळे सध्याचं लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवावं, अशी अपेक्षा मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री त्याबाबत अंतिम निर्णय घेतील. पण लॉकडाऊन वाढवण्याकडे राज्य सरकारचा कल आहे, असं आपल्याला म्हणता येईल.