1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified बुधवार, 12 मे 2021 (18:23 IST)

कोरोना लस: कोविनवर वेळ नोंदवूनही लस मिळत नसल्याच्या तक्रारी

जान्हवी मुळे
"आम्ही दहा बारा दिवसांपासून प्रयत्न करतो आहोत. आज अखेर अपॉइंटमेंट मिळाली, आणि इथे येऊन कळतं की आमचं नावच नोंदवलं गेलं नाही आणि आम्हाला लस मिळणार नाही. हे धक्कादायक आहे."
 
तेजश कोठारी मुंबईच्या नायर रुग्णालयातील लसीकरण केंद्रात आपल्याला आलेला अनुभव सांगतात. तेजश यांच्यासह साठ-सत्तर जणांना तिथे चार तास ताटकळत वाट पाहावी लागली, पण त्यांना लस मिळू शकणार नसल्याचं सांगण्यात आलं.
 
भारतात 18 ते 44 वयोगटासाठी कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होऊन आता बारा दिवस झाले आहेत. पण मुंबईत अजूनही लोकांना लशीसाठी कोविन अॅपवर नाव नोंदवण्यात आणि अपॉइंटमेंट घेताना अडचणी येत आहेत.
पण नोंद करण्याचा पहिला टप्पा पार केल्यावरही बुधवारी मुंबईत काहींना लस मिळण्यात अडचणी आल्या.
 
कोविन अॅपवर सकाळी लसीकरणासाठीचे वेळ नोंदणी सुरू असल्याचं दिसल्यावर तेजश यांनी लगेच 11 ते 2 दरम्यानची वेळ घेतली. नायर हॉस्पिटलमध्ये त्यांना लशीच्या डोससाठी वेळ मिळाली होती.
 
तेजश यांच्याप्रमाणेच इतर सुमारे सत्तर जणांनी नायर हॉस्पिटलमध्ये वेळ नोंदवली होती आणि त्यांना वेळ मिळाल्याची पोचपावती तसंच एसएमएसही आला होता. पण नायर रुग्णालयात पोहोचल्यावर वेगळं चित्र दिसलं.
 
लसीकरणावरून गोंधळाची परिस्थिती
लस घेण्यासाठी नायर रुग्णालयात आलेले एक नागरिक सांगतात, "साधारण साडेदहा वाजता आम्ही साठ सत्तर जण इथे आलो होतो. त्यांनी आमची रिसिट आणि आधार कार्ड पाहून आणि आम्हाला बाजूला बसायला सांगितलं. दहा पंधरा मिनिटांनंतर आम्हाला सांगण्यात आलं की तुमची अपॉइंटमेंट वैध नाहीतुम्हाला पुन्हा नोंदणी करावी लागेल, आज तुम्हाला लस देऊ शकत नाही.
"आम्ही आरोग्य सेतू अॅप चेक केलं तर आमची अपॉइंटमेंट तिथून गेलेली दिसली. पण आम्ही रीसीट डाऊनलोड करून ठेवली होती. पावती दाखवल्यावर अधिकाऱ्यांनी हा तांत्रिक बिघाड असल्याचं सांगितलं."
 
गर्दी जमा झाल्यानं पोलिस तिथे आले आणि लोकांना जायला सांगू लागले कारण सोशल डिस्टंसिंग राखणं शक्य नव्हतं.
 
काहींनी नायर हॉस्पिटलच्या प्रशासनाशी आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना आपण काहीच करू शकत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
तर आरोग्य विभागाच्या हेल्पलाईनवरून हा केंद्र सरकारचा प्रश्न आहे, असं उत्तर मिळाल्याचं काहीजण सांगतात. हा लोकांच्या जीवाशी खेळ झाला, अशी प्रतिक्रिया जमलेल्या लोकांमध्ये उमटली. कुणीच प्रतिसाद देत नाहीये की जबाबदारी देत नाहीये, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
 
चार तासांनंतरही अनेकांना नेमकं काय होत आहे याचं उत्तर मिळालं नाही. इथे नोंदणी करून आलेले अनेकजण हे दूरच्या उपनगरांतून आले होते. त्यांनीही घडल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्तत केली आहे.
 
कोविन अपमध्ये तांत्रिक अडचणी?
या सगळ्या गोंधळाविषयी आम्ही नायर रुग्णालयाच्या प्रशासनाशी संपर्क साधला. इथले डीन डॉ. रमेश भारमल माहिती देतात की, "महापालिकेकडून सर्व लसीकरण केंद्रांना निश्चित कोट्यानुसार लशीचे डोस आणि नावं नोंदवलेल्या लोकांची यादी दिली जाते. त्या यादीनुसारच आम्ही डोस देतो."
 
मग अडचण कुठे आली आहे? डॉ. भारमल सांगतात, "की कोविन अपनं काहीजणांना वेळ नोंदवू दिली, पण दहा पंधरा मिनिटांनंतर त्यांची अपॉइंटमेंट रद्द झाली त्यामुळे हा गोंधळ उडाला."
 
पण आपल्याला नोंदणी रद्द झाल्याचा मेसेज आलेला नाही असा दावा लोकांनी केला आहे.
 
मुंबई महापालिकेकडे दुसऱ्या दिवशी उपलब्ध होणाऱ्या डोसेस नुसार आदल्या दिवशी नोंदणी खुली होते. पण मंगळवारी कोविन वेबसाईटच्या सर्व्हरला तांत्रिक अडचणी येत असल्याचं महापालिकेनं जाहीर केलं होतं.
मग नोंदणीसाठी वेळ खुली कशी झाली, हा प्रश्न उभा राहतो. दरम्यान, कोविन अपद्वारा नोंदणी प्रक्रियेत अशा अडचणी सुरुवातीपासूनच येत असल्याचं लसीकरण मोहिमेतील एक आरोग्य कर्मचारी सांगतात.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याची दखल घेत केंद्राकडे राज्यांना स्वतंत्र अप बनवू द्यावं अशी विनंती केली होती.