बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (08:08 IST)

भाजप नगरसेवक धनराज घोगरेंसह 4 जणांवर गुन्हा दाखल; प्रचंड खळबळ

काम मिळवून देण्याच्या बहाण्याने ठेकेदाराकडून तीन लाख रुपये घेऊन एका भाजप नगरसेवकाने फसवणूक  केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. एवढेच नाही तर पैसे घेऊन देखील काम न दिल्याने पैशांची मागणी ठेकेदाराने केली असता त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. या  प्रकरणी पुण्यातील   भाजपचे प्रभाग 25 चे नगरसेवक धनराज घोगरे  यांच्यासह चार जणांवर फसवणूक आणि मारहाणीचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला आहे. सत्ताधारी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 
याप्रकरणी धनराज घोगरे, सुरेश तेलंग (दोघे, रा. हेवन पार्क, वानवडी), विनोद माने पाटील , गुड्डू Guddu ( दोघे. रा. वानवडी)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत निखील रत्नाकर दिवसे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिवसे आणि त्यांचे मित्र विक्रांत कांबळे हे भागीदारीमध्ये ठेकेदारीचा  व्यवसाय करतात. ते शौचालय, ड्रेनेज, डांबरीकरण इत्यादी कामे करतात. मागील वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये फिर्यादी यांची निखील बहीरट या मित्राने प्रभाग 25 चे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्यासोबत ठेकेदारीबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान नगरसेवकांनी त्यांना प्रभाग 25 मधील कामे देण्याचे आश्वासन दिले.
 
त्यानंतर नगरसेवक घोगरे यांच्या शिवरकर रस्त्यावरील कार्यालयात झालेल्या भेटीमध्ये ‘माझ्या प्रभागातील कामे देतो, मला तीन लाख रुपये द्यावे लागतील’, असे फिर्यादी दिवसे यांना सांगण्यात आले. त्यानंतर दिवसे यांनी नगरसेवकांच्या साथिदारांना तीन लाख रुपये दिले. परंतु पैसे देऊन देखील नगरसेवकांनी काम दिले नाही असे फिर्यादीत नमूद केले आहे.
 
दरम्यान काम न मिळाल्याने फिर्यादी दिवसे यांनी दिलेले तीन लाख रुपये परत मागितले.त्यावेळी नगरसेवक आणि त्यांच्या साथिदारांनी त्यांना मारहाण करुन पाहून घेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.फिर्यादी दिवसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वानवडी पोलिसांनी भाजप नगरसेवकासह चार जणांवर फसवणूक,मारहाण इत्यादी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.