पुण्यात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू, १०० प्रवेशाला परवानगी
पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठीची अंतिम मंजुरी एनएमसीकडून प्राप्त झाली असून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. एनएमसीच्या मंजुरीनंतर यंदाच्या वर्षासाठी १०० प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीसह स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असणारी महापालिका म्हणून पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची नवी दिल्लीतील आरोग्य मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली होती. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. या भेटीत सकारात्मक चर्चाही झाली होती. वैद्यकीय महाविद्यालयाने आजवर मंजुरीसंदर्भातील सर्व टप्पे पार केले असून आता प्रत्यक्ष परवानगी मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरी मिळणे हा क्षण पुणे शहरासाठी जितका महत्वाचा आहे, तितकाच तो अभिमानाचाही. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकल्पनेपासून तर थेट अंतिम मंजुरीमिळेपर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये भूमिका निभावता आली, याचे मनस्वी समाधान आहे.