मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (14:42 IST)

Rathi Murder Case Pune : काळजाचा थरकाप उडवून देणारे पुण्यातील राठी हत्याकांड पूर्ण माहिती

murder
पुण्यातील गाजलेल्या राठी मर्डर केसमध्ये (Rathi Murder Case Pune) एक मोठी अपडेट आली आहे. गुन्हा ज्यावेळी घडला होता त्यावेळी आरोपी हा अल्पवयीन होता हे सिद्ध झाल्यानं न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. नारायण चेतनराम चौधरी असं या आरोपीचं नाव असून त्याने 28 वर्षे तुरुंगात घालवली आहेत. आज त्या आरोपीला सोडण्याचे आदेश दिले आहेत. 
 
फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दोषी नारायण चेतनराम चौधरी हा या गुन्ह्याच्या वेळी केवळ 12 वर्षांचा असल्याने त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने आरोपी हा गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचा दावा योग्य असल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर सोमवारी आरोपीला सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे हे हत्याकांड नेमके कसे घडले होते त्या दिवशी काय घडले होते त्याचा विस्तृत वृत्तांत
 
२६ ऑगस्ट १९९४ साली पुण्यातील पौड फाट्याजवळील शीलविहार कॉलनीत अंगावर शहारे आणणारी घटना घडली. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती.
 
राठी हत्याकांडात कुंटुंबातील ७ जणांची हत्या करण्यात आला होता. त्यांच्या दुकानातील नोकरानेच ह्या हत्या केल्या होत्या. आरोपीला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली. त्यानंतर पुराव्यांची जमवाजमव करुन १९ जानेवारी १९९५ रोजी याबाबतचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
 
केसरीमल राठी यांच्या पत्नी मीराबाई (वय ५०), मुली प्रीती (वय २१) व हेमलता नावंदर (वय २४), सून नीता (वय २५), नातू प्रतीक (वय दीड वर्ष), चिराग (वय ४) आणि मोलकरीण सत्यभामा सुतार (वय ४५) यांचा या हत्याकांडात बळी गेला.
 
या हत्याकांडात हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे सर्वांचे गळे चिरले होते; तसेच त्यांच्या शरीरावरही खोल वार केले होते. खुन्यांनी महिलांना प्रतिकाराची किंवा आरडाओरडा करण्याची कोणतीही संधी दिली नव्हती.
त्यांच्या तडाख्यातून लहान मुलेही सुटली नाहीत. ता. २६ ऑगस्ट रोजी दिवसाढवळ्या घडलेले हे हत्याकांड सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस या कॉलनीतील हिमांशू अपार्टमेंटमधील रहिवाशांनाही तोपर्यंत त्याची कल्पना नव्हती.
 
केसरीमल यांची विवाहित कन्या हेमलता व जावई श्रीकांत नावंदर सातारा येथे राहत होते. ते त्यांचा मुलगा प्रतीक याच्यासमवेत ता. २६ ऑगस्टलाच सकाळी साताऱ्याहून पुण्याला आले. रक्षाबंधनाच्या दिवशी हेमलता पुण्याला येऊ शकली नव्हती.
 
त्यामुळे ती या सणासाठी आली होती. त्या दिवशी (ता. २६) सायंकाळी रक्षाबंधनाचा कार्यक्रम होणार होता, मात्र तत्पूर्वीच काळाने या कुटुंबीयांवर झडप घातली.
हिमांशू अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राठी कुटुंबीय राहत होते. ता. २६ ऑगस्टला दुपारी अडीच वाजता केसरीमल, त्यांचा मुलगा संजय आणि जावई श्रीकांत कामानिमित्त घराबाहेर गेले. त्यानंतर हा भीषण प्रकार घडला.
 
या हत्याकांडाचा कट आरोपींनी घटनेच्या तीन दिवस आधी म्हणजे ता. २३ ऑगस्टला रचला होता. त्यासाठी त्यांनी दोन धारदार चाकू व मिरची पूड खरेदी केली होती. केसरीमल यांचे कोथरूडमध्ये 'सागर स्वीट्स' नावाचे दुकान होते.
 
तेथे काम करणाऱ्या राजू राजपुरोहित व जितृ गेहलोत यांनी नारायण चौधरी या साथीदाराच्या मदतीने केसरीमल यांचे अपहरण करून पैसे लुबाडण्याचे कारस्थान रचले होते. त्यातूनच पुढे हे हत्याकांड घडले.
 
हे तिघेही ता. २६ ऑगस्टला दुपारी दोनच्या सुमारास राठी यांच्या घराजवळ पोचले. त्यावेळी केसरीमल यांचा मुलगा संजय याची मोटारसायकल त्यांना तेथे दिसली. ते घरात असावेत, हा तर्क त्यांनी बांधला. त्यामुळे थोड्या वेळाने ते पुन्हा तेथे गेले.
 
त्या वेळी ती मोटारसायकल त्यांना जेथे दिसली नाही. त्यावरून संजय राठी घरात नसावे, हे त्यांनी ओळखले. ते वर जात असतानाच, राठी कुटुंबीयांची मोलकरीण सत्यभामा सुतार त्यांना जिन्यावरून वर जाताना दिसल्या. त्यामुळे राजू चरकला. त्याने वर जाण्यास नकार दिला.
 
पण नारायणने चाकूचा धाक दाखवून त्याला जबरदस्तीने वर नेले. त्या वेळी घराचा दरवाजा थोडा उघडा होता. वर येतानाच नारायण व जितू यांनी इतर फ्लॅटना बाहेरून कड्या घातल्या. त्यानंतर हे तिघेही घरात घुसले. सत्यभामाबाई त्या वेळी फरशी पुसत होत्या.
 
घरात शिरल्यावर जितूने दरवाजा आतून बंद केला. ते पाहून सत्यभामाबाईंनी मीराबाईंना हाक मारली. त्यांनी त्या तिघांना पाहताच 'राजू, तुम्हे क्या चाहिए? दरवाजा क्यों बंद किया?' असे जोरात ओरडून विचारले. तोपर्यंत घरातील अन्य व्यक्ती हॉलमध्ये आल्या. नारायणने सर्वांना चाकूचा धाक दाखवून राहण्यास सांगितले. त्यामुळे मिराबाई घाबरल्या भीतीने त्या रडू लागल्या. तुम्हाला हव ते घेऊन जा पण आम्हाला मारु नका, अशी विनवणी त्यांनी केली. त्या वेळी जितूने त्या सर्वांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. या प्रकारामुळे घाबरून सर्व जण रडू लागले. नारायण व जितूने पुन्हा त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि मीराबाईंकडे ऐवजाची मागणी केली.
त्यानंतर त्या तिघांनी सगळ्यांना हॉलजवळच्या खोलीत नेले. नारायणने दरडावून त्यांना गप्प राहण्यास सांगितले. ते सारेच कमालीचे घाबरले होते. ऐवज कोठे आहे, असे नारायणने मीराबाईंना विचारले. त्यांनी कपाटे असलेल्या खोलीकडे बोट दाखवले. नारायण व जितूने त्यांना त्या खोलीत नेले. जितूने त्यांचे तोंड दाबले व नारायणने त्यांच्या गळ्यावर व छातीवर चाकूचे वार केले. नंतर दोघांनी त्यांना पलंगावर नेले.
 
स्वयंपाक घरात येऊन चाकू धुतले. तेथून ते पुन्हा राजू व राठी कुटुंबीय उभे असलेल्या खोलीत गेले. नारायणने संजयची पत्नी नीता हिला हॉल लगतच्या खोलीत नेले. तिच्याकडे दागिन्यांची मागणी केली. राजू तिला व तिचा मुलगा चिराग यांना घेऊन दुसऱ्या खोलीत गेला. त्या वेळी चिराग तिच्या कडेवर होता.
 
नारायणने अचानक नीताच्या गळ्यावर चाकूने वार केले. चिरागसह ती फरशीवर कोसळली. नारायणने तिच्या पोटावरही वार केला. बाजूला पडलेल्या चिरागचेही तोंड दाबून त्याच्या गळ्यावर वार केला. त्यातच हे माय-लेक मरण पावले.
त्यानंतर नारायणने स्वयंपाकघरातील बेसीनमध्ये रक्ताळलेला चाकू धुतला आणि सत्यभामाबाईंना स्वयंपाकघरात आणण्यास राजूला फर्मावले. सत्यभामाबाईंनी प्रतिकाराचा प्रयत्न केला, तेव्हा नारायणने त्यांच्यावरही वार केले. त्यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या.
 
त्यानंतर नारायणच्या सांगण्यानुसार राजू प्रीतीला बाथरूममध्ये घेऊन गेला. नारायणने तेथील मशिनची वायर कापली व तिने प्रीतीचा गळा आवळला. रक्ताच्या गुळण्या येऊन प्रीती खाली पडली. तिच्या तोंडातून आवाज येत असल्याचे जाणवल्यावर नारायणने चाकूचे दोन-तीन वार तिच्या गळ्यावर केले. काही वेळातच ती मरण पावली.
 
जितूने हेमलताला तिचा मुलगा प्रतीक याला आपल्या ताब्यात देण्यास सांगितले. तिने त्यास नकार दिला. आम्ही त्याला आजीकडे देतो, तू त्याला आमच्या ताब्यात दिले नाहीस, तर त्याला ठार करू, असे जितने तिला धमकावले. भीतीपोटी तिने प्रतीकला जितूकडे दिले. तो व राजू प्रतीकला घेऊन मीराबाई पडल्या होत्या त्या खोलीत गेले. तेथे जितूने त्याचे नाक व तोंड दाबले. त्याची हालचाल थंडावल्यावर त्याला खाली टाकले. त्यानंतर जितूने हेमलताला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटण्याच्या धावपळीत ती खाली पडली. जितूने तिच्या पोटावर गुडघा ठेवला व नारायणने तिच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला.
 
घरातील दागिने व पैशांची पिशवी घेऊन ते तिघे संजय राठी यांच्या खोलीत गेले. तेथे नारायण व जितूने रक्ताचे थेंब उडालेले कपडे बदलून संजयचे कपडे घातले. ते बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच घरातील दूरध्वनीची घंटा वाजली. तेव्हा नारायणने दूरध्वनीची वायर कापून टाकली. घरातून ते बाहेर पडणार, इतक्यात त्यांना लहान मुलाचा कण्हण्याचा आवाज आतून आला.
 
त्यामुळे तिघे परत गेले. प्रतीक फरशीवर रडत पडल्याचे त्यांनी पाहिले. जितूने त्याच्या गळ्यावर वार केले. निघताना हेमलताच्या गळ्यातील मंगळसूत्र नारायणने घेतले. सर्व ऐवज व चाकू बॅगेत टाकून ते फ्लॅटबाहेर पडले. संजय राठी सायंकाळी दुकानातून घरी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु घरातील दूरध्वनीची घंटा सतत खणाणत असूनही तो उचलला जात नव्हता.
 
घरातील सर्व जण झोपले असावेत, असे आधी त्यांना वाटले. बराच वेळ हीच स्थिती राहिल्यावर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते घरी आले. दारावरील बेल बराच वेळ दाबल्यावरही दार उघडले गेले नाही. दरवाजाला असलेल्या 'लॅच लॉक'ची किल्ली त्यांच्याकडे नव्हती. ती आणण्यासाठी ते परत दुकानात गेले. तेथून आणलेल्या किल्लीने त्यांनी दरवाजा उघडला आणि आपल्या कुटुंबीयांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह त्यांच्या नजरेस पडले.
 
या अमानुष हत्याकांडाची माहिती समजल्यावर पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त ग्यानचंद वर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त एस. बी. कुलकर्णी, पोलिस उपायुक्त माधवराव सानप आणि अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त वसंतराव श्रोत्री यांच्याकडे सोपविण्यात आला.
 
त्यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस आयुक्त अरुण कारखानीस, शरद अवस्थी, अशोक चांदगुडे, पोलीस निरीक्षक ए. एस. शेख. सुरेंद्र पाटील, दारा इराणी, विक्रम पवार यांच्या नेतृत्वाखाली सात पथके तपासासाठी कार्यान्वित करण्यात आली.
 
तपासाच्या प्राथमिक टप्प्यात राठी यांच्या घरातून एक लाखाची रोकड, नव्वद तोळे सोने, सोन्या-चांदीच्या चीजवस्तू चोरीला गेल्याचे निष्पत्र झाले. त्यामुळे चोरीच्याच उद्देशाने हे हत्याकांड झाल्याचा तर्क पोलिसांनी बांधला. राठी यांच्या दुकानात काम करणारा राजू राजपुरोहित सर्व राठी कुटुंबीयांना ओळखत होता.
 
राठी यांचा जेवणाचा डबा आणण्यासाठी तो नेहमी त्यांच्या घरी जात असे. त्यामुळे या घराची रचना आणि घरातील व्यक्तींच्या जाण्या-येण्याच्या वेळा, दिनक्रम त्याला चांगला माहीत होता. राजूला दारूचे व्यसन होते. त्याचे वर्तनही चांगले नव्हते. त्यामुळे या घटनेच्या दोन आठवडे आधीच त्याला केसरीमल यांनी कामावरून काढून टाकले होते. त्याची चौकशी करणारा एक दूरध्वनीही केसरीमल यांना ता. २६ ऑगस्टला आला होता.
 
त्यानुसार पोलीस प्रथम राजूचे घर असलेल्या नागपूर चाळीतील खोलीवर गेले. या खोलीला त्यांना कुलूप आढळले. ते तोडून पोलीस आत शिरले. तेथे नवीन कपडे नुकतेच धुऊन टाकलेले त्यांना आढळले. हे कपडे वाळवल्यावर विशेष स्वरूपाच्या यंत्राने त्यांची तपासणी करण्यात आली.
 
त्यात या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याचे आढळले. ते रक्त राठी कुटुंबीयांच्या रक्ताशी मिळतेजुळते असल्याचे स्पष्ट झाले. हा महत्त्वाचा दुवा आरोपींची निश्चिती करण्यास पोलिसांना मोलाचा ठरला. त्यानंतर आरोपींना पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली. राजू, त्याचे मित्र नारायण व जितू यांच्यासमवेत जोधपूरला गेल्याची माहिती तपासात पुढे आली आणि पोलिसांनी त्या दिशेने छडा लावण्यास सुरवात केली.
आरोपींबाबत माहिती समजल्यावर पोलीस पथके त्यांची मूळ गावे असलेल्या राजस्थानला रवाना झाली. आरोपींची रेखाचित्रे तयार करून त्याद्वारेही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. सर्वप्रथम नारायण चौधरी पोलिसांच्या हाती लागला. तो राजस्थानमधील जालबसर (जि. चुरू) येथील रहिवासी आहे. पोलीस तेथे गेले तेव्हा नारायण घरी नव्हता.
 
पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना पुण्यातील घटनेची माहिती दिली. ते ऐकून चौधरी कुटुंबीयही सुत्र झाले. पोलिसांनी त्यांना तसेच गावच्या सरपंचाला व स्थानिक पोलिसांना नारायण घरी आल्यावर लगेच कळविण्याची विनंती केली. नारायण थोड्या दिवसांनी घरी आला. त्याने केलेल्या गुन्ह्यात त्याला किती टोकाची शिक्षा होऊ शकते, हे माहिती असूनही त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नाही.
तो घरी येताच आपले कर्तव्य ओळखून त्यांनी ता. ५ सप्टेंबर १९९४ ला त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथील जिल्हा पोलिसप्रमुख उमेश मिश्रा यांनी या संदर्भात पुण्यातील पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ता. ८ सप्टेंबरला त्याला अटक करून पुण्यात आणले. नारायणला अटक केल्यावर तपासासाठी न्यायालयाने त्याला चौदा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
आपण राजू व जितूच्या मदतीने राठी कुटुंबीयांचे खून केल्याची कबुली नारायणने तपासात दिली. पुण्यात तिघे राहत असलेल्या नागपूर चाळ परिसरातील खोलीतही त्याला नेण्यात आले. हत्याकांडाबाबत दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या वाचून व विशेषतः त्यातील संशयित म्हणून आपली नावे वाचून या तिघा आरोपींनी पुणे सोडले होते.
 
घटनेच्या दिवशी रात्री ते नागपूर चाळीतीलच त्यांच्या खोलीत राहिले. त्या दिवशी ते तिघेही दारू प्यायले. रोख रकमेची वाटणी केली. गुन्ह्यात वापरलेले दोन्ही चाकू खोलीच्या परिसरातील स्वच्छतागृह जवळ पुरले. त्यानंतर ता. २७ ऑगस्टला ते तिघेही गावी रवाना झाले. जयपूर येथील लॉजमध्ये ते बनावट नावांनी राहिले. ता. एक सप्टेंबरला त्यांनी उर्वरित रक्कम वाटून घेतली. त्यानंतर वेगवेगळ्या गावी फिरत, तीर्थक्षेत्राला भेटी देऊन ते घरी परतले.
 
या प्रकरणातील प्रमुख आरोपी राजू राजपुरोहित याला ता. १४ ऑक्टोबर १९९४ ला राजस्थान पोलिसांनी जोधपूर येथे पकडले. तेथील रेल्वे स्थानकाजवळ तो व जितू राहण्यासाठी हॉटेल शोधत हिंडत होते. तेथील शास्त्रीनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना ही माहिती मिळाली. त्यांनी त्याला शिताफीने अटक केली. त्याच्यासमवेत असलेला जितू गेहलोत मात्र पोलिसांच्या तावडीतून निसटला. तेथून तो आपल्या गावी गेला.
 
जितूचा मेहुणा सैतानसिंग यानेच त्याला ता. २२ नोव्हेंबर १९९४ रोजी पोलिसांच्या हवाली केले. राजूला पकडण्यातही पोलिसांना त्याची मोलाची मदत झाली होती. त्यामुळे पोलीस आयुक्त ग्यानचंद वर्मा यांनी सैतानसिंग याचा रोख एक हजार रुपये व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला.
 
राठी हत्याकांड प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक झाल्यावर तपासानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. राजूने आपल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून फासावर न जाण्यासाठी संपूर्ण घटनेचा कबुलीजबाब देण्यास तयार असल्याचे पत्र पोलीस आयुक्त वर्मा यांना पाठविले.
 
त्यानंतर त्यांनी व न्यायदंडाधिकाऱ्यांनी राजूच्या भूमिकेची खातरजमा केली. ता. १८ डिसेंबर १९९५ रोजी त्याने आपला कबुलीजबाब नोंदविला. त्यानुसार राठी कुटुंबीयांचे हत्याकांड व चोरीची घटना उघडीस आणण्यासाठी राजूला माफीचा साक्षीदार करण्याचा निर्णय सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जाहीर केला.
 
या प्रकरणात तिन्ही आरोपींनी प्रथम चोरीचा कट रचला होता. राजूची त्यास संमती होती. या हत्याकांडात प्रत्यक्ष साक्षीदार कोणीही नाही. राजूने जरी राठी कुटुंबीयांचे घर दाखवले असले, तरी प्रत्यक्ष खुनांमध्ये त्याचा सहभाग कमी होता. हे लक्षात घेऊन राजूला माफीचा साक्षीदार करण्यात आले. जेव्हा कटाचा आरोप असतो, तेव्हा तो न्यायालयात सिद्ध करणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
 
राजू मार्फत या हत्याकांडातील क्रौर्य घडविणाऱ्या नारायण व जितू यांच्याविरुद्ध पुरावा सिद्ध करता आला. अन्यथा खुनाच्या कटाचा पुरावा सिद्ध करता आला नसता. त्यामुळेच राजूला माफीचा साक्षीदार करण्यात आले, अशी भूमिका अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयात मांडली. राजूने या हत्याकांडाबाबत ६२ घटना सांगितल्या. त्याबाबतचे पुरावेही न्यायालयात सादर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी ता. २० जानेवारी १९९६ पासून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एन. पाताळे यांच्यासमोर सुरू होती.


Edited By - Ratnadeep ranshoor