पुण्यात न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून ज्येष्ठाची आत्महत्या
पुणे शहरातील एका न्यायालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका 61 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.ही घटना बुधवारी सकाळी 11:45 च्या सुमारास शिवाजीनगर येथील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत घडली.
पुण्यातील वडकी परिसरातील रहिवासी यशवंत जाधव यांनी न्यायालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली, असे शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांना यशवंत यांच्या मृतदेहा जवळून चिट्ठी सापडली आहे त्यात घरगुती कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. 1997 पासून सुरु असलेल्या जमिनीच्या वादावरून तसेच दीर्घकाळापासून भोगत असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते नैराश्यात गेले आणि त्यांनी टोकाचे पाऊल घेतले.
या घटनेत ते गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.
जाधव यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
Edited By - Priya Dixit