जनतेचे सेवकच झाले भक्षक; भाजपा नगरसेवकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या
आता इमारतीवरील मोबाईल टॉवर देखील काढून टाकले आहेत. आता घरं देखील पाडणार असल्याची धमकी पुण्यातील दत्तवाडी परिसरातील भाजपचे नगरसेवक आनंद रिठे यांनी एका नागरिकाला दिली. या धमकीमुळे वैतागून या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे भाजपा नगरसेवकाविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दत्तवाडी येथील महादेव इमारतीमध्ये राहणाऱ्या ४६ वर्षीय संजय सुर्वे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. नगरसेवक आनंद रिठेंनी सुर्वे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सुर्वे हे दत्तवाडी परिसरात राहत होते. त्यांच्या इमारतीवर एका मोबाईल कंपनीचा टॉवर बसवण्यात आला होता. तुम्ही मला पैसे द्या, अन्यथा मोबाईल टॉवर काढून टाकला जाईल, अशी धमकी भाजप नगरसेवक आनंद रिठे यांनी संजय सुर्वे यांना दिली. रिठेंनी अनेक वेळा पैशांची मागणी करून देखील सुर्वेंनी पैसे दिले नाही. त्यामुळे नगरसेवक असलेल्या रिठे यांनी पुणे महापालिकेत संजय सुर्वे यांच्या इमारतीवरील मोबाईल टॉवर काढून टाकण्यासाठी अर्ज केला. त्यानुसार अधिकार्यांच्या परवानगीनंतर हा टॉवर काढून टाकण्यात आला.
टॉवर काढून टाकल्यानंतर रिठेंनी, आता टॉवर काढले असून पुढे घर देखील पाडणार अशी धमकी सुर्वे यांना दिली. रिठे सुर्वेंना अनेकदा घर पाडण्याच्या धमक्या द्यायचे. या मानसिक त्रासाला कंटाळून सुर्वे यांनी दत्तवाडी परिसरातील पौर्णिमा सायकलच्या दुकानात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.