शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 7 जानेवारी 2024 (12:27 IST)

शरद मोहोळ हत्या : पुण्यात टोळीयुद्धं कशी सुरू झाली? 'सांस्कृतिक राजधानी'तला गँगवॉरचा इतिहास

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर 5 जानेवारीला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 जणांनी गोळीबार केला. त्यात शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे. कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली.
 
गोळीबाराच्या घटनेनंतर गंभीररित्या जखमी झालेल्या शरद मोहोळला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
शरद मोहोळच्या लग्नाचा 5 जानेवारीला वाढदिवस होता. त्यासाठी दोघे पती-पत्नी गणपतीच्या दर्शनाला जायला निघाले होतो. त्यावेळी मोहोळवर गोळीबार झाला.
 
40 वर्षीय शरद हिरामण मोहोळ हा पुण्यातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर दिवसाउजेडी गोळीबार आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यानं या भागात खळबळ उडाली.
 
हत्येचा घटनाक्रम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये त्याचाच साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर साथीदारांचा सहभाग होता. मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा मोहोळ गँगचा सदस्य असून तो शरद मोहोळसोबत राहत होता.
 
या प्रकरणात आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी नऊ पथकं रवाना केली होती. त्यानंतर काही तासांत आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं.
 
पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूर परिसरात आरोपी मिळाले.
 
पुणे-सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 3 गावठी पिस्टल, 3 मॅगझीन, 5 जिवंत काडतुसे, 8 मोबाईल फोन, रोख रक्कम असा 22,39,810 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
 
पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सह पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी माहिती दिली की, "शरद मोहोळ आणि आरोपी पोळेकर याचं घर जवळ जवळ होतं. दोघेही सुतारदरा मध्येच राहत होते. मागच्या 20 ते 25 दिवसांपासून पोळेकर मोहोळच्या कार्यालयात कामाला जात होता."
 
पोलिसांनी पुढे सांगितलं की, "पोळेकरने गोळ्या झाडण्याआधी शरद मोहोळच्या घरचा पत्ता शोधून चौकशी केली. त्यावेळी तो घरी नसल्याचं समजलं. त्यामुळे दबा धरून बसलेल्या पोळेकरने संधी मिळताच मोहोळ याच्यावर गोळीबार केला. मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरुडच्या सुतारदरा भागात चार राउंड फायर करण्यात आले."
 
त्यानंतर आरोपींनी घटना स्थळावरून पळ काढला. त्यापैकी दोघे जण घटनास्थळावरून दुचाकी घेऊन पळून गेले. पोळेकरकडे चारचाकी होती. ती खेड शिवापूरच्या मार्गाने जाताना दिसली.
 
मोहळ हत्या प्रकरणात दोन नामांकित वकिलांचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्या वकिलांचा नेमका कशासाठी सहभाग होता हे तपासानंतर कळेल.
 
पुण्यात गँगवॉर कसे सुरू झाले?
मुंबईतील गँगवॉरच्या अनेक कहाण्या आतापर्यंत ऐकल्या आहेत. पण शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणारं पुणंही एकेकाळी गोळीबार, तलवारबाजीनं हादरत होतं.
 
हत्या, खंडणी, अपहरण, जमिनीचे व्यवहार, रिअल इस्टेटचे वाद, अवैध वाळू उपसा अशा कित्येक गुन्ह्यांचं केंद्र पुणे होतं.
 
ही गोष्ट आहे साधारण 80 च्या दशकातील. पुण्यात दोन गँग उदयास आल्या. त्यावेळी गुन्ह्याचं स्वरुप मटके, खंडणी, अवैध मालमत्ता अशा प्रकारचे होते.
 
90 च्या दशकात पुणे शहराचा जसजसा विस्तार होऊ लागला तसे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत गेलं. पण जेव्हा पुणे आणि जवळपासच्या जमिनींचे भाव गगनाला भिडले तेव्हा पुण्यात सुरू झाल्या गँगवॉर.
जमिनींच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपये कमवता येऊ शकतात याची कुणकुण स्थानिक गुन्हेगारांना लागली आणि यातूनच जन्माला येऊ लागल्या छोट्या-मोठ्या टोळ्या.
 
नव्वदीच्या अखेरीस आणि 21 व्या शतकाच्या सुरुवातीला पुणे शहराचा कायापालट होत होता. साधारण 2000 सालापासून आयटी पार्क, एमआयडीसी, उद्योगधंदे आणि प्रशस्त रहिवासी इमारती उभ्या राहू लागल्या.
 
मुंबईप्रमाणेच पुण्यातही बड्या बांधकाम व्यावसायिकांचं प्रस्थ वाढू लागलं. बांधकाम व्यवसायिकांना जमिनीचे व्यवहार करून देण्यासाठी एजंट्सचं जाळं पसरत गेलं. यातून अमाप पैसा कमवता येऊ शकतो हे टोळ्यांच्या लक्षात येऊ लागले. त्यामुळे काम मिळवण्यासाठी दोन टोळ्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आणि यातून संघर्ष पेटला, असं जाणकार सांगतात.
 
केवळ जमिनीचे व्यवहारच नव्हे तर आयटी पार्क्सवरही वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली होती. बांधकाम, कामगार वर्ग, खाणावळ, सफाई कर्मचारी अशा प्रत्येक व्यवहारात टोळ्यांचे हस्तक्षेप होऊ लागले.
 
पुण्यातील माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "गजानन मारणे आणि निलेश घायवळ हे दोघं जवळचे मित्र होते. 'मुळशी पॅटर्न' सिनेमा तुम्ही पाहिला असेल. दोघांनाही आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे होते. या टोळ्या चाळ आणि गल्ल्यांमधून उभ्या राहिल्या आहे.
 
"आपसात फूट पडून एका टोळीच्या चार टोळ्या निर्माण झाल्या. पूर्वी आंदेकर, राजा तुगंतकर टोळ्या होत्या. आजही अशा टोळ्यांची नावं बदलली आहेत. पण टोळ्या त्यांच्या कार्यपद्धतीनुसार अविरत कार्यरत असतात. केवळ टोळी प्रमुखाचे नाव बदलते."
 
ते पुढे सांगतात, "टोळीत फूट पडण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे पैसा असतो. माझा मित्र जो माझ्यासोबत एकत्र काम करणारा असतो त्याला लोक जास्त मान देऊ लागले किंवा त्यांचे वर्चस्व वाढू लागले की असूया निर्माण होते आणि एकाच्या दोन टोळ्या होतात."
 
लेखक आणि पत्रकार बबन मिंडे यांनी या विषयावर 'लॅंडमाफिया' नावाची कादंबरी लिहिली आहे.
 
9 डिसेंबर 2018 रोजी एका बातमीनिमित्त बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितले, "2000 पूर्वी लोकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये जमिनीविषयी अत्यंत वेगळी भावना होती. जमिनीतून पीक येतं आणि त्यावर आपला उदरनिर्वाह चालतो अशीच त्यांची समजूत होती. पण 2000 नंतर लोकांच्या लक्षात येऊ लागलं की जमिनीतून अमाप पैसा कमवता येतो."
 
"आयटी क्षेत्राच्या उदयानंतर पुण्याचा चेहरामोहरा बदलू लागला. पुण्याच्या आजूबाजूच्या गावातल्या जमिनीला भाव येऊ लागले. त्यातून जमीन मोकळी करून देणारे आणि व्यवहार पूर्ण करून देणाऱ्या एजंटची संख्या वाढू लागली. जमिनीच्या व्यवहारासाठी लाखो रुपये मोजले जाऊ लागले.
 
"कॉर्पोरेट कंपन्यांना एकगठ्ठा जमीन मिळवून देणाऱ्या एजंटची गरज पडू लागली. कधीकधी जमीन मोकळी करून घेण्यासाठी मसल पॉवरचा उपयोगही करावा लागत असे. त्यातून गुंडगिरी बळावली," मिंडे सांगतात.
 
पुण्यातील गाजलेले गँगवॉर
2010 सालच्या कुडले खून प्रकरणात 26 जणांची 2019 साली निर्दोष सुटका करण्यात आली. हे सगले घायवळ टोळीत होते असा दावा होता.
 
दत्तवाडीपासून ते पर्वतीपर्यंत गोळीबार झाल्याच्या बातम्या तेव्हा आल्या होत्या. गँगवॉरमधून हा खून झाला असा पोलिसांनी आरोप ठेवला होता. MCOCA अंतर्गत आरोप ठेवले गेले पण कोर्टात यातले कोणतेही आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.
 
2014 मध्ये दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाला आणि त्यात अमोल बधे याचा मृत्यू झाला. यामागे मारणे गँगवर संशय होता पण हा आरोपही सिद्ध झाला नाही.
 
पोलिसांनी याप्रकरणी 11 लोखंडी कोयते, 3 गावठी पिस्तुलं, 10 मोबाईल हॅंडसेट, 2 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला होता.
अगदी सात-आठ वर्षांपूर्वीपर्यंत पुण्यात टोळीयुद्ध चालायचं असं पोलीस सांगतात. 2015मध्ये पुण्याच्या उरळी कांचन येथे प्रकाश हरिभाऊ उर्फ अप्पा लोंढे यांची दिवसा ढवळ्या गोळ्या घालून आणि नंतर तीक्ष्ण वार करून हत्या झाली आणि पुणे पुन्हा हादरलं. त्यांच्यावर हत्या, खंडणी, अपहरण, अवैध वाळू उपसा,इत्यादी मिळून अशा तब्बल 65 केसेस होत्या.
 
2004 साली त्यांच्यावर MCOCAअंतर्गत कारवाई करण्यात आली आणि त्यांना तुरुंगवास झाला. ते जामिनावर बाहेर आले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांचे प्राण गेले.
 
पुणे आणि परिसरात ज्या अनेक टोळ्या कार्यरत होत्या त्यांच्या संघर्षातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
 
उरळी कांचन भागात तणाव इतका वाढला की पटापट सर्व दुकानं बंद झाली. हत्येनंतर सर्वांत जास्त भीती वाटत होती ती म्हणजे पुण्यात पुन्हा गॅंगवार उसळणार याची.
 
मोहोळ विरुद्ध मारणे संघर्ष
 
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, 2006 मध्ये मारणे गॅंगच्या सुधीर रसाळ यांची बाबा बोडके गॅंगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती.
 
सुधीर रसाळ यांच्या हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्धाला सुरुवात झाली होती. या हत्येचं प्रत्युत्तर म्हणून मारणे गॅंगनं संदीप मोहोळची हत्या केली.
 
त्यानंतर या दोन टोळ्यांमधला संघर्ष तीव्र होत गेला. संदीप मोहोळच्या हत्येनंतर त्याचा नातेवाईक शरद मोहोळनं या हत्येचा कथित सूत्रधार किशोर मारणे यांची 2010मध्ये हत्या केली. या हत्येसाठी शरद मोहोळला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
 
मारणे गॅंग आणि नीलेश घायवळ गॅंगमध्ये देखील पुण्यात चकमकी उडाल्या आहेत. मारणे गॅंगच्या सदस्यांनी घायवळ यांच्यावर हल्ला केला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले होते. घायवळ गॅंग कोथरूड भागात होती आणि पौड रोड भागात वर्चस्व स्थापन करण्याचा या गॅंगचा प्रयत्न होता, असं इंडियन एक्स्प्रेसनं पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
 
तरुण मुलं गँगमध्ये कसे सामील होत गेले?
80 ते 90 च्या दशकातही पुण्यात गुन्हेगारी होती. काहीप्रमाणात गँग कार्यरत होत्या पण 2000 सालानंतर पुण्यातल्या टोळ्यांकडे जमीन व्यवहार आणि बांधकाम व्यावसायिकांकडून अमाप संपत्ती येऊ लागली.
 
कोण किती पैसे कमवतो? कोण अधिक कॉन्ट्रॅक्ट मिळवू शकतो? पुण्यातल्या बहुतांश भागांत कोणाचे वर्चस्व आहे? किती भागांतील आयटीपार्क कोणाच्या ताब्यात आहेत? कामगार वर्ग कोणाचा आहे? यासाठी या टोळ्यांमध्ये स्पर्धा होत्या.
 
टोळ्यांची ताकद वाढवण्यासाठी तरुण मुलांची आवश्यकताही होती. त्यांना भुरळ पाडण्यासाठी महागड्या गाड्या, सोनं, पैसा, दारू अशा गोष्टींचे अमिष दाखवले जात होते असंही जाणकार सांगतात.
पुण्यातील माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं की, "माझ्या टोळीत किती जास्त मुलं यावर हल्ली दहशत निर्माण केली जाते. शिवाय, राजकीय आशीर्वाद, महागड्या गाड्या, टोळीतल्या मुलांचे संख्याबळ ही सर्व ताकद घेऊन रुबाबात चालणाऱ्या गुंडाची चर्चा असते. तरुण मुलं त्यांच्याकडे अनेकदा आयडॉल म्हणून पाहतात आणि त्यांच्याकडे जातात."
 
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार या टोळ्या विविध व्यावसायिकांकडून आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करत असत. पौड, पिरंगूट आणि मुळशीच्या भागातून आखाड्यातली मुलं या गॅंगमध्ये भरती केली जात.
 
"पण तरुण वर्गाने गुन्हेगारीचा शेवट काय असतो हे कायम लक्षात ठेवावे. गुन्हेगारीच्या नादाने कुसंगतीला लागू नये," असं आवाहन भानुप्रताप बर्गे यांनी केलं होतं.
 
Published By- Priya Dixit