शनिवार, 15 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 15 फेब्रुवारी 2025 (15:05 IST)

राजस्थान येथील भारत - पाक सीमा लगत असणाऱ्या श्री तनोट राय माता मंदिर येथे साजरी होणार यंदा शिवजयंती.....

chatrapti shivaji maharaj
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास महाराष्ट्र राज्यातील शिवप्रेमींना माहित व्हावाच पण देशभरातील शिवप्रेमींना माहीत व्हावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आपल्या देशातील सैनिकांना मिळावी त्यामुळे सीमा सुरक्षा बल आणि लष्करच्या जवानांच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सीमेवरती साजरी होणार आहे.
या उद्देशाने मराठा टायगर फोर्स च्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात येते, याच धर्तीवर यावर्षी येत्या 22 फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील जैसलमेर जिल्ह्यात भारत पाकिस्तान सीमेवर असणाऱ्या श्री तनोट राय माता मंदिर च्या परिसरात सीमा सुरक्षा बलाच्या जवानांसोबत शिवजयंती निमित्त ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा टायगर फोर्स चे संस्थापक अध्यक्ष तथा उत्सवप्रमुख- राजस्थान शिवजयंती उत्सव समिती संदीप लहाने पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
यावेळी संतोष शिंदे (प्रवक्ता- संभाजी ब्रिगेड, राजस्थान शिवजयंती उत्सव समिती सदस्य),शरद लोंढे पाटील ( सह उत्सव प्रमुख राजस्थान शिवजयंती उत्सव समिती), अनिल मोरे (राजस्थान शिवजयंती उत्सव समिती सदस्य, शिवप्रेमी),मा. महेश टेळे पाटील ( राजस्थान शिवजयंती उत्सव समिती सदस्य),विजयराव काकडे ( भारत क्रांती मिशन- प्रमुख, राजस्थान शिवजयंती उत्सव समिती सदस्य),विजय आप्पा बराटे, विशाल लहाने पाटील,रमेश पाटील,यशवंत जगताप,व्यंकटेश देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते. 
 
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शरद लोंढे आणि राजस्थान येथील स्थानिक शिवप्रेमी सुद्धा नियोजन करत आहेत, तसेच अखंड मराठा समाज पुणे, भारत क्रांति मिशन, बिश्नोई समाज गॅस एजन्सी स्टाफ, राष्ट्रीय गॅस एजन्सी कामगार संघटना या सर्व स्तरातून या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. 
शिवजयंती निमित्त महाराष्ट्रीयन पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण, शिव व्याख्यान, पुरस्कृत बक्षिसे, सन्मान समारंभ तसेच सीमा सुरक्षा बल मध्ये कार्यरत असणाऱ्या काही अधिकारी व कर्मचारी शिवप्रेमींना तसेच वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या काही शिवप्रेमींना देखिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने एकुण पाच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, या पुरस्कार मध्ये महाराष्ट्र आणि राजस्थान येथील शिवप्रेमी आहेत. 
 
हा कार्यक्रम श्री तनोट राय माता मंदिर, परिसरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे, या कार्यक्रमासाठी  महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन्ही राज्यातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर मंडळींना निमंत्रित केलेले आहे, या कार्यक्रमासाठी राजस्थानचे राज्यपाल यांना देखील निमंत्रीत केले आहे, या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र आणि त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्या बद्दल संपूर्ण भारत देशातील जनतेला इतिहास माहिती व्हावा, यासाठी  संपूर्ण भारत देशात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी व्हावी हा उद्देश ठेवून मराठा टायगर फोर्स आणि सोबत इतर अनेक संघटना मिळून या कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत, या कार्यक्रमासाठी भारत क्रांती मिशन यांचे देखील अत्यंत मोलाचे योगदान आहे. 
 
दरम्यान, 19 फेब्रुवारी रोजी राजस्थान मधील जयपुर येथे देखील बिर्ला ऑडिटोरियम हॉल मध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत क्रांती मिशन आणि त्यांचे प्रमुख पदाधिकारी म्हणून विजयराव काकडे यांच्या पुढाकाराने राज्यपाल, तसेच राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही मंत्री आणि आमदार खासदार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा शिवजयंती सोहळा जयपुर मधे सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी असते, शिवजयंती हा राष्ट्रीय सण झाला पाहिजे ही गेले कित्येक वर्षापासून आमची मागणी आहे, राष्ट्रीय सण म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात छत्रपती शिवरायांची जयंती शासन स्तरावर साजरी व्हावी, आणि देशभरातील इतर महापुरुषांच्या जयंतीच्या सुट्टी प्रमाणे छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण भारत देशात लोकांना जयंती उत्सव साजरा करण्याकरिता सुट्टी जाहीर करावी अशी मागणी  संदीप लहाने पाटील यांनी केली आहे.