मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (15:35 IST)

सोमय्या यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची घेतली भेट

पुणे महानगरपालिकेच्या आवारात शिवसैनिकांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावेळी सोमय्यांसह इतर 4 खासदारही उपस्थित होते. यावेळी सोमय्यांनी केंद्रीय गृहसचिवांना निवेदन सादर करत पुणे धक्काबुक्की प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, “उद्धव ठाकरे सरकारने संजय राऊत यांच्या बेनाम कंपनीला कोव्हिड सेंटरचे कंत्राट दिले. 100 कोटींचा घोटाळा केला. हे घोटाळे उघड होण्याच्या भीतीने शिवसेनेच्या 100 गुंडांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, यासंदर्भात भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी, गिरीश बापट, रक्षा खडसे आणि मनोज कोटक यांच्यासह केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली आहे. तसेच गृहसचिवांना या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आवाहन केले आहेत.”
 
किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह मिळून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्याचे व्हिडीओ फूटेज सादर केलेत. शिवसेनेचे गुंड मोठं- मोठे दगड मारत होते आणि पोलीस त्यांना मदत करत होते. याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.