मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (08:24 IST)

पुणे जिल्ह्यात 26 एसटी कर्मचारी निलंबित; राज्यात 918 निलंबित

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून संप  पुकारण्यात आला आहे. एसटी महमंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरु केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. महामंडळाकडून राज्यात 918 तर पुणे जिल्ह्यात 26 कर्मचारी निलंबित केले आहेत.
 
एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे.त्यामुळे गावी गेलेल्या लोकांना पुन्हा माघारी येण्यास खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.याच संधीचा फायदा घेत खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट होऊ लागली होती.अखेर महामंडळाकडून खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली.त्यांनी एसटीचे दर आकारावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही एसटी कर्मचारी संप मागे न घेता आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
 
दररोज कोटींचा फटका
 
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणी साठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.दिवाळी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असतानाच संपाचे हत्यार उपसले आहे.राज्यातील जवळपास 120 पेक्षा जास्त डेपोत सध्या संप सुरु आहे.त्यामुळे एसटीला रोज जवळपास कोटींच्या घरात फटका बसत आहे.