शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (16:05 IST)

तरुणाने लग्नात फायर करण्यासाठी आणले पिस्तुल; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मित्र किंवा जवळचे नातेवाइक यांच्या लग्नात फायर करण्यासाठी एका तरुणाने पिस्तूल आणले. त्याने सोशल मीडियावर त्याचे फोटो देखील टाकले. मात्र गुंडा विरोधी पथकाने सोमवारी (दि. 2) चिंचवडमधून त्याच्या मुसक्‍या आवळत पिस्तुल हस्तगत केले.
 
सूरज सिंगसाहब जैस्वाल (वय 20,रा.सुभाष पांढारकर नगर,आकुर्डी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील कर्मचारी विजय दत्तात्रय तेलेवार यांनी सोमवारी (दि. 2) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सूरज याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी सूरज याला अटक केली. त्यांच्याकडून 40 हजार रुपये किंमतीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 40 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.
 
शक्‍ती प्रदर्शन करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये लग्नकार्यात पिस्तूलातून गोळीबार करण्याची पद्धत आहे. यापुढील काळात आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाइकांच्या लग्नात गोळीबार करता यावा, यासाठी आरोपीने हे पिस्तुल उत्तर प्रदेशातून आणले असल्याचे पोलीस तपासात समोर आहे. त्याने पिस्तूल हाताळत असल्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर टाकला. याबाबतची माहिती एका नागरिकाने गुंडा विरोधी पथकाला दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.