प्रत्येक पोलीस ठाण्यात होणार उपायुक्तांचा जनता दरबार
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन मधील प्रत्येक पोलीस ठाण्यात दर आठवड्याला पोलीस उपायुक्तांचा जनता दरबार होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात तक्रारींचे निवारण न झाल्यास पोलीस उपायुक्त कार्यालयात न जाता जनता दरबारात जाऊन आपल्या तक्रारी मांडता येणार आहेत.
परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी या बाबत माहिती दिली.17 जुलै रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली. त्या भेटीदरम्यान गृहमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना काही सूचना केल्या. त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात जनता दरबार घेण्याचे देखील सांगण्यात आले होते. त्यानुसार पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनच्या हद्दीत प्रत्येक पोलीस ठाण्यात दर आठवड्याला जनता दरबार घेण्यात येणार आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्याला ठराविक वार नेमून देण्यात आला आहे. संबंधित दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजताच्या कालावधीत पोलीस उपआयुक्त जनता दरबार घेतील.अनेक नागरिक त्यांच्या तक्रारींचे पोलीस ठाणे स्तरावर निरसन न झाल्यास थेट पोलीस उपायुक्त कार्यालयात जातात. अशा नागरिकांच्या तक्रारींचे निरसन पोलीस ठाणे स्तरावर तिथेच केले जावे, यासाठी हा जनता दरबार घेण्यात येत आहे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारींचे निरसन पोलीस ठाण्यात न झाल्यास जनता दरबारात आपल्या तक्रारी मांडाव्यात,असे आवाहन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.
या दिवशी या पोलीस ठाण्यात होणार जनता दरबार –
सोमवार – सांगवी पोलीस स्टेशन
मंगळवार – तळेगाव दाभाडे,तळेगाव एमआयडीसी व शिरगाव पोलीस चौकी यांचा दरबारात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे होईल.
बुधवार – देहूरोड पोलीस स्टेशन,रावेत पोलीस चौकी यांचा दरबार देहूरोड पोलीस स्टेशन येथे होईल.
गुरुवार – चिखली पोलीस स्टेशन
शुक्रवार – हिंजवडी पोलीस स्टेशन
शनिवार – वाकड पोलीस स्टेशन