शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (15:46 IST)

सोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार सुरु

करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचे दिसत असल्याने, आता अनेकांकडून निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जावी,अशी मागणी केली जात आहे. आम्ही त्याबाबतचा विचार करत आहोत, मुख्यमंत्री आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार करीत आहोत.त्याबाबत निश्चित सकारात्मक निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.पुणे शहर आणि जिल्ह्याची करोना आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 
 
यावेळी अजित पवार म्हणाले की, पुण्याचा करोनाबाधित रुग्णांचा दर ३.९ टक्के इतका असून १.६ टक्के इतका मृत्यू दर आहे.त्यामुळे आपण लेव्हल तीन मध्ये येत आहोत. तसेच येत्या काळात येणार्‍या तिसर्‍या लाटेचा विचार करता, सर्व तयारी करण्यात आली आहे. मात्र तिसरी लाट येऊच नये, अशी आमच्यासह सर्वांची भावना असून मात्र तरी देखील पुढील धोके लक्षात घेऊन, प्रशासन सज्ज आहे.
 
तसेच ते पुढे म्हणाले की, करोनामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. त्यातील एक म्हणजे दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत. तरी देखील मागील दरवाजाद्वारे दुपारनंतर दुकाने सुरू असतात हे सांगण्यात आले आहे. एका बाजूला रुग्ण संख्या कमी झाल्याने, व्यवहार सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आजच्या बैठकीत सर्वांनी केली आहे.या सर्व बाबींचा विचार करता, सोमवारपासून सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ आणि हा निर्णय सकारात्मक असणार आहे. अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.