पुण्यातली दोन मंदिरं पाडून दर्गे उभे राहिले- मनसे
आधी बाबरी आणि सध्या भारतात सुरू असलेलं ज्ञानवापी प्रकरण आता महाराष्ट्रात तेही पुण्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातील दोन दर्ग्यांच्या जागा पूर्वाश्रमीच्या मंदिरांच्या आहेत असा दावा करुन त्यासाठी लढा उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे.
पुण्यामध्ये नारायणेश्वर आणि पुण्येश्वर अशी दोन मंदिरं होती ती पाडून तेथे दर्गे उभे राहिले असा याबाबत दावा करण्यात आला आहे. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे म्हणाले, पुण्येश्वराला पण तेवढाच मोठा इतिहास आहे.
"अल्लाउद्दीन खिलजीचा एक सरदार बडा अरब, पुण्यावर चाल करुन आला त्यावेळी त्यानं हे भगवान शंकराचं मंदिर उध्वस्त केलं. एक मंदिर नाही तर दोन मंदिरं उध्वस्त केली. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरं उध्वस्त केली.
"तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही दोन्ही मंदिरं कुठं आहेत. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडील बाजूला कुंभार वेसजवळ आहे. जिथं आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांच्या वर मशिदी निर्माण झाल्या आहेत," असा दावा अजय शिंदे यांनी केला आहे.