पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा
वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला. आता पुण्यातल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच पुण्यातल्या या मंदिरांच्या जागी छोटा शेख, बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला आहे. या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभारण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.
मुघल आक्रमकांनी पुण्यातील पुण्यश्वर आणि नारायणेश्वर ही दोन मंदिरे पाडून तिथे दर्गा उभा केला. यातील एक मंदिर शनिवारवाड्याच्या समोर आहे, तर दुसरं मंदिर लाल किल्ल्याजवळ आहे, असं वक्तव्य अजय शिंदे यांनी केलं. याबाबत त्यांनी पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारला पत्रही लिहिलं आहे. तसंच या मंदिरांसाठी मनसे आगामी काळात लढा उभारणार असल्याची घोषणा अजय शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांच्या या भूमिकेला हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनीही पाठिंबा दिला आहे.