शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (08:16 IST)

पुण्यातील 183 अँमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्याचा निर्णयाला कडाडून विरोध : वंदना चव्हाण

पुण्यातील 183 अँमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्याचा घाट महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजप पक्षाने घातला आहे. शहराच्या दृष्टीने अतिशय घातक अशा या निर्णयाला पुणेकरांनी कडाडून विरोध करण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.शहर विकास आराखड्यातील आरक्षणे तसेच अँमेनिटी स्पेस या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असतात. मात्र, अँमेनिटी स्पेसला विशिष्ट कारणासाठी आरक्षण नसल्यामुळे कोणीही कुठल्याही कारणासाठी त्याचा वापर करू शकते. यासाठी अॅमेनिटी स्पेसचा ‘मास्टर प्लॅन’ करण्याची गरज आहे.
 
यापूर्वी देखील सदर अँमेनिटी स्पेसचा ‘मास्टर प्लॅन’ करावा, असे महापालिका आयुक्तांना सूचित केले होते. या सूचनांची पर्वा न करता भाडे तत्वावरच्या या प्रस्तावाला स्थायी समिती समोर मान्यतेसाठी आणले आहे.
 
पुणे शहराचे प्रदूषण झपाट्याने वाढत आहे आणि ते वाढत राहणार आहे. विकासाच्या नावाखाली झाडे कापली जातात. परंतु, त्याप्रमाणात झाडे लावली जात नाहीत. 74 व्या घटना दुरुस्तीने महापालिकांनी ‘अर्बन फॉरेस्ट’ (शहरी वने) विकसित करावीत, असे बंधन घातले आहे. ग्लोबल वार्मिंगचे संकट आज आपल्याला भेडसावत आहे. अशा वेळी मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणे याला महत्व प्राप्त झाले आहे. बांधकाम झाले की, त्याठिकाणी पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया पूर्ण बंद होते. त्याचे परिणाम आपण पावसानंतर झालेल्या पूरपरिस्थितीत अनुभवली आहे अशा परिस्थितीत मोकळ्या जागांवर पुन्हा काँक्रीट जंगलचा हा घाट सर्व पुणेकरांनी हाणून पाडला पाहिजे. तसेच सर्वांनी एकत्रित येऊन सदर प्रस्तावाला विरोध करणे ही आजची गरज आहे, असे चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.