MPSC यश मिळवलेल्या दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणाचं गूढ काही प्रमाणात उलगडलं आहे. तिच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी तिचा मित्र राहुल हांडोरे याला 21 जून रोजी रात्री उशिरा मुंबईवरुन अटक केली.
दर्शना आणि राहुल दोघंही 12 जूनपासून बेपत्ता होते. 18 जून रोजी राजगडाच्या पायथ्याजवळ दर्शनाचा मृतदेह सापडला. पण राहुल मात्र बेपत्ता होता. पोलिसांनी पाच पथकांची नेमणूक करुन त्याचा शोध सुरु केला होता.
पोस्टमार्टम रिपोर्ट वरून दर्शनाचा खून झाल्याचं निष्पन्न झाल्यावर राहुल संशयाच्या फेऱ्यात आला. अखेर त्याला अटक करण्यात आली. दर्शना पवार हिने लग्नास नकार दिल्याने तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून पुढील तपासानंतर सविस्तर माहिती हाती येईल, असं पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं.
राहुल हांडोरे नेमका कोण आहे? त्याच्या अटकेनंतर दर्शनाच्या कुटूंबियांनी काय प्रतिक्रीया दिली ते जाणून घेऊया.
एमपीएससीची तयारी करणारा राहुल हांडोरे
दर्शना जशी एमपीएससीची तयारी करत होती, तसा 28 वर्षांचा राहुलही एमपीएससीची तयारी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो गेली 4-5 वर्ष एमपीएससीची तयारी करत होता. त्याच्या लहान भावाबरोबर पुण्यातील कर्वेनगर भागात भाड्याच्या खोलीत तो राहत होता. त्याने बीएस्सी पदवी घेतली होती.
एबीपी माझा या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार राहुल हा मुळचा नाशिक जिल्हातल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर लातुक्यातील शाहवाडी गावाचा आहे. त्याच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य असून त्याचे वडील पेपर वाटपाचं काम करतात. तो गेल्या काही वर्षांपासून पुण्यात त्याच्या भावासोबत राहत होता. त्याचा भाऊ सुद्धा जुजबी काम करुन रोजगार मिळवत होता.
डिलीवरी बॉय म्हणून काम करत राहुल पैसे कमवायचा
पुणे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी राहुल हासुद्धा MPSC ची तयारी करत होता. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून तो पार्टटाईम जॉब करून परीक्षा देत होता. सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेस साठी पार्टटाईम जॉब करत होता."
राहुल एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी स्थानिक अभ्यासिकामध्ये जायचा. त्याला काही मोजके मित्र होते. तो डिलिव्हरीचं काम सांभाळत आपल्या अभ्यासात व्यस्त असायचा. 2023 सालची एमपीएससीची प्रीलीमीनरी परिक्षा त्याने दिली होती. या परीक्षेत यश मिळण्याची त्याला अपेक्षा होती.
दर्शना आणि राहुलची ओळख कशी झाली?
पत्रकार परिषदेत पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शना आणि राहुल यांची लहानपणापासून ओळख आहे. दर्शनाच्या मामाचं घर आणि राहुलचं घर हे समोरासमोर असल्याने त्यांची पूर्वीपासून ओळख होती. त्यानंतर ते पुण्यातही संपर्कात असावेत असा अंदाज आहे.
पण दर्शनाच्या आईने माध्यमांशी बोलताना मात्र राहुल आणि दर्शनाची मैत्री असल्याचं नाकारलं आहे. "दोघांमध्ये साधी मैत्रीही नव्हती. ती फक्त अभ्यासाविषयी त्याच्याशी दोन शब्द बोलायची. त्याने तिचा घात केला," असं दर्शनाच्या आईने म्हटलं.
माध्यमांमध्ये आलेल्या काही रिपोर्टनुसार दर्शना आणि राहुल एकत्रच एमपीएससीची तयारी करत होते.
पोलिसांनी काय म्हटलं?
आरोपी राहुल हांडोरे याला अटक केल्यानंतर आज (22 जून) पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी एक पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली.
ते म्हणाले, "18 जून 2023 रोजी वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह सापडला होता. त्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर दर्शना दत्तू पवार (वय 26) असं निष्पन्न झालं. परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार मुख्य आरोपी राहुल हांडोरे (वय 28) हा आहे, हे निष्पन्न झालं."
"घटनेपासून राहुल फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली. अखेर त्याला काल (21 जून) रात्री उशीरा मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आलं.
प्राथमिक माहितीनुसार लग्नास नकार दिल्याच्या कारणामुळे राहुलने दर्शनाचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत आणखी तपास करण्याची गरज आहे. त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली असून लवकरच सविस्तर माहिती माध्यमांना दिली जाईल, असं गोयल यांनी म्हटलं.
Published By- Priya Dixit