शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2023 (23:02 IST)

महाराष्ट्रात मे महिन्यातही पाऊस पडणार? बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता

महाराष्ट्रात एप्रिल महिना हा पावसाचा ठरला. एप्रिल महिन्यात राज्यातल्या विविध भागांमध्ये गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. विदर्भातल्या काही नद्यांमध्ये तर एप्रिल महिन्यातल्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मे महिन्यातही काही भागांमध्ये ढगाळ वातावरण अनुभवायला मिळतंय. अशातच बंगालच्या उपसागरात 8 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
 
याचा परिणाम महाराष्ट्रावर होईल का, राज्याला मे महिन्यामध्ये पावसाचा सामना करावा लागेल का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
 
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ?
पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व बंगाल उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रात 8 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन 9 मे पर्यंत अजून ते तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊन त्याच बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे प्रवास होऊ शकतो.
 
“अजून आयएमडी कमी दाबाच्या क्षेत्राबद्दल काही अलर्ट दिलेला नाहीये. अंदमान-निकोबार मध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 8 ते 12 मे मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यांचे इशारे देण्यात आलेले आहेत. मच्छिमारांसाठी, पर्यटकांसाठी हे इशारे देण्यात आलेले आहेत,” असं के एस होसाळीकर यांनी सांगितलं.
 
सध्या अनेक माध्यमांमधून या होऊ शकणाऱ्या चक्रीवादळाचा उल्लेख मोका असा केला जातोय. पण अजून हवामाव विभागानं अधिकृतपणे त्याचं नाव जाहीर केलेलं नाही असं होसाळीकरांनी सांगितलं.
 
याचसोबत वादळाच्या ट्रॅकचे अनुमान आल्यावर अधिक गोष्टी स्पष्ट होतील, असंही ते म्हणाले.
 
चक्रीवादळ कसे तयार होतात?
पृथ्वीच्या मध्यभागी विषुववृत्त आहे. त्याच्या उत्तरेला 23.5 अंशांवर कर्कवृत्त आणि दक्षिणेला मकरवृत्त आहे. इथं सूर्याची किरणं थेट पडत असल्यामुळं इथल्या समुद्राचं पाणी जास्त तापतं. पाणी जास्त तापलं की त्याची वाफ होते. गरम हवा, वाफ ही आपली जागा सोडून वरवर जाते. ही हवा वर गेल्यामुळे समुद्राजवळ दाब कमी होतो.
 
हा कमी दाबाचा प्रदेश तयार झाल्यावर आजूबाजूच्या प्रदेशातली हवा ती पोकळी जागा भरण्यासाठी येते.
 
ही प्रक्रिया सतत सुरू असते. म्हणजे कमी दाबाच्या केंद्राभोवती जास्त दाबाच्या प्रदेशातले वारे पिंगा घालू लागतात. हळुहळू या वाऱ्यांचा वेग आणि गती वाढत जाते आणि एक चक्र तयार होतं.
 
पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एकदा फिरते. याला परिवलन म्हणतात. यामुळे पृथ्वीच्या फिरण्यामुळे आणि वाऱ्याच्या दिशेनुसार चक्रीवादळाचा प्रवास सुरू होतो.
 
ही वादळं अनेक दिवस आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करू शकतात. त्यांच्या जन्माची ठिकाणं आणि नेमका प्रवास सांगता येणं कठीण असलं तरी अंदाज बांधता येऊ शकतो.
 
चक्रीवादळांची नावं नेमकी कशी ठेवली जातात?
 
जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वादळांची नावं ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे. त्यानुसार विविध देश त्यांच्यातर्फे नावं सूचवतात. वादळांची नावं देशांकडून आणि सुचवलेल्या नावांमधूनच सुचवली जातात.
 
1953पासून मायामी नॅशनल हरिकेन सेंटर आणि वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएमओ चक्रीवादळं आणि उष्णकटीबंधीय चक्रीवादळांची नावं ठेवत आला आहे.
 
परंतु उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांची नावं ठेवली गेली नव्हती. कारण या वादळांची नावं ठेवणं एक वादग्रस्त काम होतं. वर्ष 2004 मध्ये ही स्थिती बदलली. डब्ल्यूएमओच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनेल रद्द करण्यात आलं आणि संबंधित देशांनाच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावं ठेवायला सांगितलं.
 
यानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनी मिळून एक बैठक घेतली. या देशांनी 64 नावांची एक यादी सोपवली. त्यात प्रत्येक देशात येणाऱ्या चक्रीवादळासाठी 8 नावं सूचवण्यात आली. उत्तर हिंदी महासागरातील क्षेत्रात येणाऱ्या वादळांची नावं या सूचीतून ठेवली जातात.
 
बंगालच्या उपसागरातील स्थितीचा परिणाम महाराष्ट्रावर होईल?
बंगालच्या उपसागरातील स्थितीचा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नसल्याची शक्यता होसाळीकर यांनी व्यक्त केली.
 
“बंगालच्या उपसागरातल्या स्थितीचा आणि राज्यातल्या ढगाळ वातावरणाचा संबंध नाही. बंगालच्या उपसागरातल्या स्थितीचा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नाही. ते खूप दूर आहे. त्याचं ट्रॅक प्रेडीक्शन आल्यावर अजून गोष्टी स्पष्ट होतील,” असं त्यांनी सांगितलं.
 
एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मे महिन्यातली परिस्थिती कशी असेल?
राज्यात एप्रिल महिन्यात रेकॅर्ड पाऊस पडला. अनेक वातावरणीय स्थितींमुळे हे झालं असं तज्ज्ञांनी सांगितलं. या पावसासाठी दमट वारे, कमी दाबाचे क्षेत्र आणि त्यामुळे निर्माण झालेल्या ढगांचं आच्छादन हे कारणीभूत ठरलं. मे महिन्यातली राज्यातल्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळत आहेत.
 
“ए्प्रिल महिन्यामध्ये खूप पाऊस पडला. पण मे महिन्यात राज्यात कमी पाऊस आहे. एप्रिल महिन्यात गारपीट पण होती. मेमध्ये पाऊस कमी आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे.
 
काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पण एप्रील मध्ये गारांसोबत जसा पाऊस पडला त्या तुलनेत मेमध्ये पाऊस कमी दिसतोय. एप्रिल महिन्यात हवामानाची जशी परिस्थिती होती, तशी दिसत नाहीये. पाऊस नसला तर तापमानात वाढ होईल,” असं पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी सांगितलं.
 
Published By- Priya Dixit