शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (21:18 IST)

लुडो गेममध्ये युवकाने गमावले “इतके” लाख रुपये; मुंबईत घडला हा धक्कादायक प्रकार

कोरोनामध्ये सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांना घरी बसून टाईमपास म्हणून विविध गेम खेळण्याची सवय लागली आहे. त्यातच मोबाईलवर लुडो हा ऑनलाईन गेम सर्रास खेळला जाऊ लागला. मात्र हा गेम एका युवकाला फारच महागात पडला आहे. लुडो खेळताना युवकाने 60 लाख रुपये गमावले आणि या पैशांची वसुली करणाऱ्यांनी बंदुकीच्या धाकावर युवकाला लुटले आहे. मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
 
याबाबत अधिक माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या युवकाला काही जणांनी लुडो खेळात हरवले आणि त्याने 60 लाख रुपये गमावल्याचे सागितले. क्लॉडिएस मुदालियार असे या युवकाचे नाव आहे. हा युवक मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार त्याने मुंबईमधील धारावी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.
 
काय आहे नेमके प्रकरण?
 
क्लॉडिएस मुदालियारच्या मुशारफ खान नावाच्या मित्राने त्याच्याकडून 5 हजार रुपये उधार घेतले होते. हे पैसे परत देण्यासाठी मुशारफने त्याला सांताक्रूझला बोलावले होते. येथे मुशारफचा मित्र वेलू मुरगन आणि इतर लोकांना क्लॉडिएसला भेटला. त्यानंतर या लोकांनी क्लॉडिएसला दारु पाजली. मद्यधुंद अवस्थेत असताना त्याला लुडो खेळण्यास सांगितले. तू या खेळात 60 लाख रुपये हरल्याचे या लोकांनी क्लॉडिएसला सांगितले.
 
यानंतर मुशारफ आणि त्याच्या मित्रांनी क्लॉडिएसला 60 लाख रुपये देण्यास सांगितले. परंतु त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर या लोकांनी क्लॉडिएसच्या अंगावर जेवढे सोन्या-चांदीचे दागिने होते ते बंदुकीच्या धाक दाखवून लुटले. इतकेच नव्हेतर आरोपींनी क्लॉडिएसला आपल्या क्लबमध्ये बंद करुन मारहाण केली. याशिवाय तुझ्याकडून मिळालेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांची किंमत 60 लाख रुपये नाही. त्यामुळे घरामधून आणखी सोने आणि पैसे आणण्यास त्याला सांगितले.
 
तक्रारदार क्लॉडिअस च्या माहितीनुसार, ही घटना 3 ऑक्टोबरला घडली. आरोपींच्या धमकीनंतर तो घाबरला होता. त्याने धारावी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सांगितलं की, “आम्ही आरोपींविरोधात IPC च्या कलम 341, 364(A), 392, 506(2), आणि 34 तसेच आर्म्स अॅक्टच्या कलम 3 आणि 25 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु, अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना सांताक्रूझ येथे घडली आणि जिथे घडली ते ठिकाण वाकोला पोलिसांच्या क्षेत्रात येते आणि त्यामुळे हे प्रकरण वाकोला पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor