बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. वायएसआर
Written By अभिनय कुलकर्णी|

वायएसआर विजयाबद्दल निःशंक होते- सोनिया

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या अपघाती निधनाबद्दल कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी दुःख व्यक्त केले आहे. विकासाप्रती असलेल्या बांधिलकीसाठी वायएसआर कायम स्मरणात रहातील, अशी श्रद्धांजली उभय नेत्यांनी व्यक्त केली.

'वायएसआर' यांनी काढलेल्या पदयात्रेमुळे कॉंग्रेस आंध्र प्रदेशात सत्तेत आली. त्यांचा दुर्देवी मृत्यू हे पक्ष, राज्य आणि देशासाठी मोठे नुकसान आहे, अशा शब्दांत श्रीमती गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रेड्डी यांच्या मृत्यूचे वृत्त आल्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी हा धक्कादायक बातमी मिळाल्याचे सांगून त्यांनी रेड्डी यांच्यासंदर्भातील आठवणी जागवल्या. ''नुकत्याच झालेल्या आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत पक्ष कशी कामगिरी करेल, यावर काही सदस्यांनी शंका व्यक्त केली होती. त्यावर वायएसआर यांनी आपल्यावर विश्वास ठेवा. आंध्रच्या लोकांचा कल मला माहिती आहे. मी आणि माझ्या सहकार्‍यांनी खूप काम केले आहे आणि आम्हीच सत्तेत येऊ. अखेरीस त्यांचे म्हणणेच खरे ठरले,'' अशी आठवण सोनियांनी सांगितली.

वायएसआर हे जनतेप्रती असलेल्या बांधिलकीसाठी कायम स्मरणात रहातील, असे सांगून त्यांनी आंध्र प्रदेशात गरीब आणि शेतकर्‍यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या होत्या, याचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी करून दिले.