शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (12:27 IST)

महाविकास आघाडीने उघडपणे पाठिंबा मागावा - ओवेसी

owaisi
राज्यसभेच्या 6 जागासांठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे आमदार आणि काही अपक्ष आमदारांना मड आयलॅंडमधील हॉटेल रिट्रीट ठेवण्यात आलंय. 10 जूनपर्यंत त्यांना याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
 
महाविकास आघाडीकडून संपर्क नाही - ओवेसी
महाविकास आघाडीनं आमच्याशी अजून मतांसाठी संपर्क केलेला नाही. आमच्या आमदारांशीसुद्धा कुणी चर्चा केलेली नाही, असं एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवेसींनी म्हटलं आहे.
 
"त्यांना आमच्या मतांची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. नको असेल तर ठिक आहे. आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ. आमची आमच्या आमदारांशी चर्चा सुरू आहे. 10 तारखेच्या मतदानाच्या आधी आम्ही निर्णय घेऊ," असं ओवेसींनी स्पष्ट केलं आहे.
 
महाविकास आघाडीने उघडपणे पाठिंबा मागावा, असंसुद्धा ओवेसींनी म्हटलंय.
 
6 जून 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी(6 जून 2022) शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर या आमदारांची रवानगी मड आयलॅंडमधील हॉटेल रिट्रीटमध्ये करण्यात आली आहे.
 
तर मंगळवारी मुख्यमंत्री तिन्ही पक्षांच्या आमदारांशी बोलणार आहेत. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत विजय होईल असा विश्वास आमदारांना या बैठकांमध्ये दिला जाईल.
 
सहाव्या जागेवरून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिवसेनेला महाविकास आघाडीची साथ मिळणार की यात भाजप बाजी मारणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
 
यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी सांगितलं, "उद्या आमदारांची बैठक आहे. हे मतदान तिथे ठेवलेल्या पेनने केलं जातं. पहिली पसंती, दुसरी पसंती, तिसरी पसंती द्यावी लागते. याचं मार्गदर्शन देण्यासाठी बैठका होत आहेत. पक्षाच्या उमेदवारांबद्दल अडचण नाही. कारण मतदान केल्यानंतर आपल्या प्रतिनिधींना ते दाखवायचं आहे. प्रश्न आहे अपक्ष आमदारांचा. महाविकास आघाडीशी अपक्ष आमदारांचे चांगले संबंध आहेत."
 
आमदारांची हॉटेल'वारी'
शिवसेनेच्या आमदारांना बैठकीसाठी येताना हॉटेलमध्ये राहण्याच्या तयारीनीशी येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व आमदार एकाच ठिकाणी सुरक्षित आणि एकत्र रहावेत यासाठी शिवसेनेकडून आमदारांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही हॉटेलमध्ये शिफ्ट करणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
 
दुसऱ्या बाजूला राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईत बैठक पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली.
 
राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचं ब्लू प्रिंट तयार आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या बैठकीनंतर आमदार आशिष शेलार यांनी दिली. ते म्हणाले, "भाजपचा तिसरा उमेदवार निवडणुकीत नक्की जिंकेल आणि शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव होईलच. ज्यांना दररोज घोडेबाजाराचं स्वप्न पडतं ते तबेल्यात राहत असतील. आमदारांना नजरकैदेत ह्यांना ठेवावं लागतंय. आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचं पाप करणारे लोक लोकशाहीबाबत बोलतात. आमदारांवर विश्वास नाही याचं हे लक्षण आहे. आमदारांचा एवढा अपमान कोणीही केला नसेल."
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, "केंद्रीय यंत्रणांचा वापर या निवडणुकीत होतोय याचा पुरावा संजय राऊत यांच्याकडे आहे का. कदाचित पराभव समोर दिसत असल्याने कारण दिलं जात आहे. ज्यांचे पक्षीयस्वास्थ्य बिघडलं आहे."
 
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपने त्यांचे आमदार सांभाळावेत असं सतेज पाटील म्हणाले आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदारांचा घोडेबाजार होत असल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, "राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होत आहे. हे दुर्दैवी आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मात्र दुर्दैव आहे की महाराष्ट्रात अनेक वर्षानंतर अशी गोष्ट होत आहे. ही कुठल्याही सुसंस्कृत राज्यासाठी चांगली बाब नाही."
 
मतदानासाठी कोर्टाकडे अर्ज
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता यावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ईडी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. वकिलांमार्फत ईडी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणई ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासाठी अर्ज केला आहे. महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं असल्याने तुरुंगात असलेल्या नेत्यांनीही मतदानासाठी कोर्टाकडे विचारणा केली आहे.
या दोन्ही अर्जांवर 8 जूनला सुनावणी होणार आहे.
 
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या पाच मिनिटाला मतदान करणार अशी भूमिका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. राज्य सरकारने धान आणि हरबऱ्याच्या अनुदानासाठी राज्य आणि केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा याचा परिणाम राज्यसभा मतदानावर होईल असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची संधी द्यावी यासाठी छगन भूजबळ पाठपुरावा करत आहेत अशी माहिती दिलीय.