मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (21:34 IST)

"शिवसेनेकडून सहाव्या जागेचा विषय संपला" संजय पवार शिवसेनेचा मावळा - संजय राऊत

sanjay raut shivsena
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. सहाव्या जागेसाठी आपल्या भूमिकेवर शिवसेना ठाम असून संभाजीराजे छत्रपतींना सेनेने उमेदवारीसाठी पक्ष प्रवेशाची अट घातली होती. मात्र आता संभाजीराजेंचा पत्ता कट करुन कोल्हापूरचे शिवसेनेचे कट्टर समर्थक संजय पवार यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय पवार हे कडवट समर्थक आहेत. या मावळ्याला आम्ही राज्यसभेची उमेदवारी देण्यासंबंधी निर्णय घेतलाय. फायनल घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
 
संजय पवार यांचं नाव फायनल आहे. संजय पवार हा सेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय. पण अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
 
कोण आहेत संजय पवार आणि त्यांचा राजकीय प्रवास
 
गेले ३३ वर्षे कट्टर शिवसैनिक असणाऱ्या संजय पवारांचे नाव थेट राज्यसभेचा उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे. शिवसेनेने अनेकदा सामान्य कार्यकर्त्याला संधी देत धक्कातंत्राचे राजकारण केले आहे. यामध्ये आता पवारांची वेळ आली आहे. त्यांना जर संधी मिळाली तर सेनेत सामान्य शिवसैनिकही मोठा होऊ शकतो याचा नवा पुरावाच मिळेल, असं बोललं जात आहे.
 
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले पवार हे कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित आहेत. ३३ वर्षापूर्वी म्हणजे १९८९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. एकदा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना संधी मिळाली. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा नगरसेवक अशी त्यांची महापालिकेत ओळख होती. यामुळे पवार हे तीन वेळा तीन वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले. शहराच्या सर्वच प्रश्नावर आंदोलन करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे. त्यामुळे लढाऊ कार्यकर्ता, कट्टर शिवसैनिक अशी पवारांची कायमची ओळख. भाजप, काँग्रेसने अनेकदा त्यांना आमिष दाखवत पक्षात घेण्याचा प्रयत्न केला, पण शिवसैनिक ही ओळख कायम ठेवण्यातच पवारांनी आनंद मानला.