मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. रमझान
Written By
Last Updated : सोमवार, 6 मे 2019 (11:58 IST)

रमझानच्या महिन्यात पाळण्यात येणारे काही नियम

रमझान महिन्यात रोझे ठेवतात. सूर्योदय ते सूर्यास्त काही खायचे प्यायचे नाही. रमझान महिन्यात पती-पत्नीने शरीर संबंध ठेवायचा नसतो. राग, भांडणे, शीवीगाळ (कुणाशीही) टाळायची असतात. दिवसभर कुराणाचे पठण करायचे अथवा झोपून राहायचे. म्हणजेच शरीराची ऊर्जा अगदी कमी खर्च होते त्यामुळे भूक लागत नाही आणि रमझान पाळला जाऊन पुण्य प्राप्त होते. 
 
दिवसभर उपास केल्यावर (पाणीच काय, आवंढाही गिळायचा नाही) सूर्यास्त झाल्यावर १५ मिनिटांचा अवधी असतो. काय खावे ह्याचे कठोर नियम नसले तरी, फळे, खजूर इत्यादी अत्यंत माफक प्रमाणात खायचे असते. ह्या १५ मिनिटात तेलकट, मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत. (पण तेच जास्त विकले/खाल्ले जातात) मोठ्या कालावधीच्या उपासानंतर पोटावर, पचनशक्तीवर एकदम अनिष्ट ताण पडू नये असा विचार ह्या मागे आहे. वेळही १५ मिनिटांचाच असल्यामुळे 'किती' खावे ह्यावरही आपसूक बंधन येते कारण १५ मिनिटांनंतर
 
संध्याकाळचा मोठा नमाज असतो. रमझानच्या पुण्यप्राप्तीमध्ये ह्या नमाजाचे (आणि पहाटेच्या) महत्त्व जास्त आहे. तो चुकविल्यास पुण्यप्राप्ती होत नाही. ह्या नंतर भूक असेल तर खाणे-पिणे चालते. रात्री नेहमीप्रमाणे जेवण होते. पहाटे सूर्योदयापूर्वी पुन्हा पूर्ण जेवण होते. बायका स्वयपाकात व्यस्त असतात. झोप येऊ नये (आणि पहाटेचे जेवण चुकू नये)म्हणून पुरूष, मुले रात्रभर जागतात. मुले-मुली अंगणात किंवा घरात खेळतात, सायकली फिरवतात, घोळक्या-घोळक्याने भटकतात. मोठी माणसे त्यांना ती सवलत देतात, ओरडत नाहीत. उत्साही वातावरण असतं (सूर्यास्त-सूर्योदय ह्या काळात). मशीदींमधून, कित्येक उपहारगृहांमधून रोज संध्याकाळी, फळे कापून, (उपवास सोडण्यासाठी) मोफत ठेवलेली असतात. कोणीही जाऊन (हिन्दू, ख्रिश्चन कोणीही) तिथे उपवास सोडू शकतो. श्रीमंत व्यापारी, उद्योजक, इतर धनिक महिनाभर एखाद्या मशीदीस रोज २५०-३०० माणसांना पुरेल (किंवा गरज असे त्या प्रमाणे) इतके फळफळावळ दान करतात.
 
आजारी व्यक्ती, म्हातारे आणि १२ वर्षाखालील मुले ह्यांना रोझे माफ आहेत. त्याच प्रमाणे प्रवासात रोझे ठेवण्याची सक्ती नाही. बाकी सर्वांनी रोझे ठेवलेच पाहिजेत. एखाद दिवस रोझा ठेवला नाही, काही कारणाने ठेवता आला नाही, तर त्याच्या बदलात ५ दिवस रोझा (म्हणजे कडक उपवास) ठेवावा लागतो. सूर्यास्तानंतर चित्रपटगृहे, उपाहारगृहे जरी उघडत असली तरी रमझान मध्ये करमणूक निषिद्ध मानली आहे. महिनाभर उपास करून शरीराची शुद्धी आणि कुराण पठण करुन आत्म्याची शुद्धी, असा रमझान हा शुद्धीकरणाचा महिना आहे.