रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (08:23 IST)

राष्ट्रवादीच्या तालुकाप्रमुखासह 1 दोषी; अडीच वर्षे कारावासासह दंडाची शिक्षा

नाशिकरोड - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ केलेल्या बस तोडफोड आंदोलन प्रकरणी न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुखासह एकावर दोषी असल्याचा ठपका ठेवत शिक्षा सुनावली.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी ईडीने 2016 साली ताब्यात घेतले होते. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात ठीक ठिकाणी आंदोलने केली होती.
 
17/3/2016 रोजी नाशिक-पुणे महामार्गावरील त्रिमूर्ती प्लाझा समोर गणेश अशोकराव गायधनी (रा. पळसे) व बाळू पुंजा चौधरी (रा. कारखाना रोड, पळसे) यांनी संगनमत करून छगन भुजबळ यांना अटक केली या कारणावरून एस टी चालक फिर्यादी रवींद्र नारायण गारकर (रा. केळवड,नगर) यांच्या ताब्यातील बस क्र. MH 14 BT 4376 अडवून दगड फेकून काचा फोडल्या, तसेच वाहक निलेश श्रीहरी इंगळे यांची गच्ची पकडून गाडी खाली ओढून मारहाण करीत बस मधील प्रवाशी मध्ये घोषणाबाजी करीत दहशत निर्माण केली.
 
म्हणून संशयित विरोधात नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस हवालदार शाम जाधव यांनी करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
 
बुधवारी यावर जिल्हा सत्र न्यायालय क्र. 9 न्यायाधीश एम. एम. शिंदे यांनी संशयितांना दोषी ठरवित अडीचवर्षे कारावास व दंड ची शिक्षा सुनावली. गणेश गायधनी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष असून न्यायालयाच्या या निकालाने खळबळ उडाली आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor