1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (22:01 IST)

भंगार व्यापारी यांनी केला 100 कोटींचा जीएसटी घोटाळा!

नाशिक शहरातील औद्योगिकदृष्ट्या महत्वाचा भाग असलेल्या सातपूर-अंबड लिंकरोडवर भंगार माल व स्टील विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन बड्या व्यावसायिकांनी खोट्या कागदपत्रांद्वारे २० कोटींचा आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवत शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे, मात्र त्याची व्याप्ती वाढत जाणार असे दिसून येत असून  हा घोटाळा आता जवळपास १०० कोटींपर्यंत जाणार असल्याची शक्यता तपासी पथकातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. यात वेगळे असे कि, कामगारांना कोणतीही माहीतही नसताना त्यांच्याच नावावर बनावट कंपन्या दाखवून कागदावरच सुमारे २०० काेटींहून अधिक व्यवसाय दाखवून त्यापाेटी सुमारे २० काेटींचा जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट पदरात पाडून घेण्यात आला आहे. केंद्रीय व राज्य जीएसटीच्या नाशिक आयुक्तालयाने  हा घोटाळा उघडकीस आणले असून यातील मुख्य  संशयित तिघांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे, तर ही चौकशी टाळून अटक टाळण्यासाठी थेट न्यायालयात धाव घेतली. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व फेटाळला आहे.
 
जीएसटी महाराष्ट्र प्रतिबंध शाखेने अद्याप संशयितांना अटक केली नाही,  तरी तिघा व्यापाऱ्यांना कधीही अटक हाेण्याची शक्यता आहे. तपासी पथकाने न्यायालयात संशयितांच्या अटकपूर्व जामिनासाठी आक्षेप घेत घोटाळ्याची व्याप्ती मांडली. सातपूर- अंबड लिंकरोडवरील संजीवनगरमधील महाराष्ट्र स्टील ट्रेडर्सचे अजिमुल्ला नईम चौधरी, हिरा स्टीलचे हफिजुल्ला चौधरी आणि गाैरी इस्पातचे अत्ताउल्ला चौधरी या तिघांना चौकशीसाठी समन्स बजावले हाेते. तिघांनीही इनव्हॉइसवर इनपुट टॅक्स क्रेडिटचा बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले हाेते. दोन्ही कंपन्यांनी दाखल केलेल्या जीएसटी रिटर्ननुसार प्रत्यक्षात जागेवर काहीच स्टॉक नसल्याचे दिसून आले. त्यांच्या दोन्ही फर्मची जीएसटी नोंदणी २५ मार्चपासून रद्द करण्यात आली आहे. सीजीएसटी कायदा, २०१७ व सुधारित २०२२ च्या तरतुदीनुसार संशयितांनी शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
 
संशयित अजिमुल्ला चौधरीने महाराष्ट्र स्टील ट्रेडर्स फर्म तयार केली. त्याद्वारे इनव्हॉइसवर मिळवलेला बनावट आयटीसी परत करण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर २०२१ मध्ये आणखी एक बनावट कंपनी स्थापन करून त्याद्वारे आयटीसी मिळवला. दुसरा व्यापारी हफिजुल्लाहने हिरा स्टील फर्म व गौरी इस्पात यांनी जारी केलेल्या इनव्हॉइसवर मिळवलेला आयटीसी परत करण्यासाठी पुन्हा याच कालावधीत आणखी एक बनावट कंपनी बनवून आयटीसी मिळवला. अत्ताउल्ला नइम चौधरीने गौरी इस्पात, तेज स्टील आणि गजानन एंटरप्रायझेस या फर्म बनवल्या.
 
तपासणीत. अनु एंटरप्रायजेस नावाच्या पुरवठादारांपैकी एकाची जीएसटीआयएन क्रमांकावरून छाननी केली असता चुंचाळे गावात छाेट्या खोलीत राहणाऱ्या या व्यक्तीला दोन्ही फर्मच्या मालाचा पुरवठा केला गेल्याचे आढळले. तसेच ही जागा झोपडपट्टी परिसरात असलेले निवासी  घर असल्याचे पडताळणीत उघड झाले असून,  अनु एंटरप्राइजेसचे मालक आकाश लिंबोळे यांच्या घेतलेल्या जबाबानुसार,या फर्मबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हते. पत्ता, खरेदी, विक्री आणि बँक व्यवहाराशी संबंधित सर्व बाबी अताउल्ला चौधरीकडूनच केल्या जात हाेत्या. अशाप्रकारे महाराष्ट्र स्टील, हिरा स्टील, अनु एंटरप्रायझेसने जारी केलेल्या इनव्हॉइसवर बनावट आयटीसी घेतला होता. दोन्ही कंपन्यांकडून सप्टेंबर ते डिसेंबर कालावधीत खरेदी आणि विक्रीची पडताळणी केल्यानंतर हिरा स्टीलकडे ५७ काेटी ५५ लाख ७ हजार मूल्याच्या स्टॉकमधील वस्तूंवर १० काेटी ३० लाख ५७ हजार आयटीसी शिल्लक असणे आवश्यक आहे. तसेच, महाराष्ट्र स्टीलकडे २३ काेटी २१ लाख ३७ हजार मूल्याच्या स्टॉकमधील मालावर ४ काेटी १७ लाख ३४ हजारांचा स्टॉक शिल्लक आवश्यक आहे. तथापि, दोन्ही अर्जदारांच्या व्यवसायाच्या ठिकाणी स्टॉकची तपासणी केली असता दोन्ही फर्मशी संबंधित केवळ ९ लाखांचा साठा आढळला. यावरूनच बनावट कागदपत्रांद्वारे आयटीसी घेऊन फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
 
यापूर्वीही संशयितास अटक अत्ताउल्ला नइम चौधरी यास गेल्याच वर्षी महाराष्ट्र जीएसटी अधिकाऱ्यांच्या चौकशीत मुंबईच्या एका फर्मकडून बनावट आयटीसी घेतल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली हाेती. आता पुन्हा या प्रकरणात त्याचे नाव पुढे आले आहे.
 
प्रत्यक्षात नाही, फक्त कागदावरच व्यवहार
सीजीएसटी प्रवि्हेंटवि्ह विभागाच्या तपासात नाशकातील तीन व्यापाऱ्यांनी गैरप्रकारातून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करून कागदावरच मालाचा पुरवठा व खरेदी केल्याचे दाखवले. सुमारे १०० काेटींचा घोटाळ्याचा अंदाज असून सुमारे २० काेटींची आयटीसी व्यापाऱ्यांनी मिळवल्याचे निष्पन्न झाले आहे. अॅड. शशिकांत दळवी, विशेष सरकारी वकील.