पॉलिटेक्निकच्या ऑनलाईन प्रवेशासाठी 15 दिवसांची मुदतवाढ
पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे मिळण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे पॉलिटेक्निकच्या ऑनलाईन प्रवेशाची मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पॉलिटेक्निकच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
सध्या दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया सुरू आहेत. दहावीनंतर पदविका अभ्यासक्रम अर्थात पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. मात्र कोरोनाचे संकट लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांकडे क्रिमीलेअरच्या प्रमाणपत्रासह अनेक आवश्यक कागदपत्रे जमा झालेली नाहीत. त्यामुळे या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी पालकांतून सातत्याने होत होती. अखेर पॉलिटेक्निकच्या ऑनलाईन प्रवेशासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास वेळही मिळणार आहे.