मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (07:58 IST)

मनसेने केलेल्या सर्व्हेचा कौल म्हणतो, लॉकडाऊन हटवावा

लॉकडाऊनबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर सर्वेक्षण घेतले. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊन हटवावा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. त्यामुळे मनसेने यासंबंधी एक ऑनलाईन सर्व्हे केला असून त्यानुसार ७०.०३ टक्के लोकांनी लॉकडाऊन हटवावा, असे मत व्यक्त केले आहे. तर ८९.३ जणांनी लॉकडाऊनमुळे नोकरीवर परिणाम झाल्याचे मत नोंदवले आहे. 
 
मनसेने समाजमाध्यमांवरून विविध मुद्द्यांवर सात दिवसांत नागरिकांचा कौल जाणून घेतला. यामध्ये ५४ हजार १७७ नागरिकांनी या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आपली मते नोंदवली.
 
लॉकडाउनच्या काळात नोकऱ्या आणि उद्योगधंद्यांसाठी सरकारकडून योग्य मदत मिळाली नसल्याचे ८४.९ टक्के जणांनी सांगितले. तर राज्य सरकारने शिक्षणाबद्दल घेतलेला निर्णय योग्य नसल्याचे ५२.४ टक्के जणांनी म्हटले आहे. तसेच शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत नसल्याचे ७४.३ टक्के जणांनी म्हटले आहे. तर लोकलसेवा पूर्ववत व्हावी असे ७३.५ टक्के लोकांचे मत आहे. लॉकडाऊनच्या काळात मदत वेळेत आणि योग्य मिळाली नसल्याचे ६०.२ टक्के जणांनी सांगितले. तर वीज बिलांबद्दल समाधानी नसल्याचे ९०.२ टक्के जण म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी थांबूनच काम करत होते, याबद्दल ६३.६ टक्के जणांनी नाराजी व्यक्त केली आहे.