अमळनेर :येत्या ३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीतर्फे आयोजित केलेल्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत दोन भव्य सभा मंडप आहेत. ३ दालनांमध्ये बालमंच, युवा मंच यासह ४ विचार मंचावर विद्रोहीचे विविध कार्यक्रम बहरणार आहेत. दोन दिवसांमध्ये विद्रोहीत ३ परिसंवाद होणार आहे. तसेच १३ गटचर्चा आणि एक विशेष व्याख्यान होईल. ४ गझल आणि काव्य संमेलन व शेकोटी काव्य मैफिल असेल. ३ सत्रात साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांशी साहित्य गप्पा व संवाद होईल. सांस्कृतिक व कला प्रकारात आदिवासी गाणी कला दर्शन, खान्देश लोककलांचे सादरीकरण व महाराष्ट्र दर्शनसह विविध अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. २ अहिराणी कथाकथनांच्या कार्यक्रमासह दोन कथा अभिवाचन कार्यक्रम सोबत २ एकपात्री नाट्य प्रयोगासह एका एकांकिकेचे सादरीकरण मंचावर होणार आहे. युवा रॅप कलाकारांचे रॅप गीतांचे सादरीकरण लक्षवेधी ठरेल. कला दालनात शिल्पकला, सुलेखन, चित्रकला, कलात्मक फलकलेखन, कॅलिग्रॉफी अशा पाच विविध कला प्रकारांचे लाईव्ह सादरीकरण असा भरगच्च कार्यक्रम आहे.
महाराष्ट्रातील कथा, कविता, नाटक, ललित आदी साहित्य प्रकारातील १०८ मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहे. १९ जिल्ह्यातील ५२ लोकशाहीवादी विचारवंत, अभ्यासक, ५ कथाकथनकार आणि ४ इतिहासकार, २७ गझलकार यांसह ४ चार नाट्य व सिनेमालिका अभिनेते, एकपात्री नाटककार, एकांकिका नाट्यछटाकार साहित्य नगरीत आपल्या विविध कार्यक्रमाच्या सहभागातून साहित्य प्रेमींसाठी मेजवानी घेऊन येतील.
महाराष्ट्रातील वारकरी, महानुभाव, लिंगायत आदी पाच धर्मापीठांचे प्रमुख प्रतिनिधी, २२५ लोककलाकारांसह ७ गायक शाहीर, भीमगीतकार, रॅप कलाप्रकारातील २ युवा कलाकार, बोलीभाषांचे १५ अभ्यासक, ७ नामवंत पत्रकार आणि विद्रोहाच्या लेखणीची तोफ तयात करणारे कलाकार यांच्यासह ७ शिल्पकार, दोन व्यंगचित्रकार, एक चित्रकाव्य कलाकार, २ पोस्टर प्रदर्शनकार, ४ सुलेखनकार, २ फलक लेखनकार आपले योगदान देवून साहित्य चळवळीचा जागर यशस्वी करणार आहे.
१८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साहित्य चळवळीतील साहित्यिक, मान्यवर कार्यकर्ते, शाहू, फुले, आंबेडकरी पुरोगामी चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी, कामगार व विद्यार्थी चळवळीतील तसेच आदिवासी क्षेत्रात काम करणारे परिवर्तनवादी, संविधानिक मूल्यांसाठी लढणारे कार्यकर्ते यांच्यासह विद्रोही साहित्य संमेलनात सहभागी होणार असल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष श्याम पाटील यांनी राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक प्रा.डॉ.लिलाधर पाटील, संमेलनाचे मुख्य निमंत्रक रणजित शिंदे, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार, कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, संयोजक करीम सालार, जळगाव, अविनाश पाटील, धुळे, प्रशांत निकम, अमळनेर यांनी कार्यक्रमांचे स्वरूप जाहीर करतांना संयोजन समितीतर्फे जाहीर केले आहे.