राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ नेते ईडीच्या रडारवर; भाजप नेत्याची धक्कादायक माहिती
एका मागोमाग एक राजकीय नेत्यांना ईडीच्या नोटिसा असून तसेच त्यांची चौकशी देखील करण्यात येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत सध्या पत्राचा घोटाळा प्रकरणी तुरुंगात असून त्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे काही ज्येष्ठ तथा बडे नेते देखील ईडीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठी राजकीय उलथापाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लवासा आणि जलसिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांची नाव गुंतली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या १० पैकी किमान ५ नेत्यांना तरी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून चौकशीसाठी नोटीस येऊ शकते, असे भाकीत भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी वर्तवले आहे. अलीकडेच मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक बडा नेता तुरुंगात जाईल, असा इशारा दिला होता.
विशेष म्हणजे कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जलसिंचन घोटाळ्याची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या दिशेने असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता रणजीतसिंह निंबाळकर यांनी त्याही पुढे जात राष्ट्रवादी काँग्रेसचे १ नव्हे तर ५ मंत्री ईडीच्या रडारवर असल्याचा इशारा दिला आहे.
रणजीतसिंह निंबाळकर यांनी यासंदर्भात म्हटले की, घोटाळ्यांच्या चौकशीबाबत सरकारला काय वाटते, ते महत्त्वाचे आहे. मी व्यक्तीद्वेष करत नाही. मला त्यामध्ये रस नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते चोर आहेत. त्यामुळे मोहित कंबोज बोलतायत तो चोर नेमका कोण आहे, हे त्यांच्याशी बोलल्यानंतरच कळेल. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित अनेक विषय आहेत. लवासा प्रकल्पासाठीच्या जमीन हस्तांतरणावरून सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना फटकारले आहे. त्या काळात जलसंपदा मंत्री कोण होते? जमिनी कशा दिल्या? त्याचे निकष काय होते?, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आता लवासा प्रकरणातच चौकशी होते की अन्य विषयावर, हे बघावे लागेल, असे रणजीतसिंह निंबाळकर यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर बऱ्याच प्रकरणांमध्ये आरोप झाले आहेत. त्यामध्ये कोणाचेही दुमत नाही. त्यामुळे आता चौकशी केल्यानंतरच योग्य गोष्टी पुढे येतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० पैकी किमान ५ नेत्यांना तरी ईडीकडून नोटीस येऊ शकते, असे रणजीतसिंह निंबाळकर यांनी मोहित कंबोज यांनी अलीकडेच काही ट्विटस केली होती. या माध्यमातून मोहित कंबोज यांनी राज्यातील आणखी एका बड्या नेत्यावर कारवाई होण्याचे संकेत दिले होते. ट्विटमध्ये कंबोज यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत यांची नावं लिहली आहेत. त्यानंतर कंबोज यांनी पाचवी जागा रिक्त सोडली आहे. याठिकाणी लवकरच एका नेत्याचा नंबर लागेल, असे संकेत मोहित कंबोज यांनी दिले आहेत.