मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (15:42 IST)

प्रवाशांना घेऊन निघालेली क्रुझर दरीत कोसळली; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू

accident
नाशिक : पेठ तालुक्यातील पळशी- चिखली रस्त्यावर खाजगी प्रवाशी वाहतुक करणारी क्रुझर दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत.
अवैध वाहतूक आज दोन जणांच्या जीवावर बेतली आहे. पेठ तालुक्यातील चिखली येथील प्रवासी वाहतूक करणारी जीप दरीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सविस्तर असे की, पळशी येथील कृष्णा गाडर यांच्या मालकीची क्रुझर (क्रमांक MH- 10 , C9389) पेठ – पळशी – चिखली या रस्त्यावर खाजगी प्रवासी वाहतुक करत होती.
सदरचे वाहन पेठ येथे बाजार व दिवाळी सणानिमीत्त होणाऱ्या खरेदी निमित्ताने पेठ येथे आलेले प्रवाशी घेऊन परतीला गावाकडे जात असताना पळशी – चिखली रस्यावरील तिव्र वळणावर ब्रेक फेल झाल्याने गाडी लगतच्या दरीत कोसळली. वाहनातून प्रवास करणारे धनराज लक्ष्मण पाडवी (वय 15) व रामदास गायकवाड (वय ५५ रा. चिखली) यांचा मृत्यू झाला असून २५ प्रवाशी जखमी झाले आहे.
 
जखमींना उपचारासाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
 
गाडीने प्रवास करणारे जखमी प्रवासी चालक पुंडलीक कृष्णा गाडर (वय ३२ वर्ष रा . चिखली) यांच्यासह देवीदास गाडर (वय १५) , मुरलीधर दोडके (वय ५२), लक्ष्मण पाडवी (वय ३५) , गोकुळ जांजर (वय ७) , लक्ष्मण तुंबडे (वय ६०), वसंत चौधरी (वय ४५), रेखा करवंदे (वय ३५), मोहन जांजर (वय ३३) , वामन गायकवाड (वय ३५) , मयुर भवर (वय १०), लक्ष्मीबाई पवार (वय ६०), जिजाबाई गाडर (वय ६५), साळीबाई इजल (वय ६७) , मनी मानभाव (वय ७०) , वृषाली तुंबडे (वय १३ , अंजनी भुसारे (वय ४८) , कमळीबाई ठेपणे (वय ५०) , जयराम गाडर (वय ३२) , येवाजी भवर , हरी ठेपणे (वय ६५) सर्व राहणार चिखली तर पवना ब्राम्हणे वय १० रा फणसपाडा , कुसुम ब्राम्हणे (वय ३५ रा. फणसपाडा ), शिवराम दरोडे (वय ४० रा . भुवन) , मोतीराम भोये (वय ६५ रा. उंबरपाडा) हे जखमी झाले असुन पेठ येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार चालू आहेत. हरी काशिनाथ ठेपणे यांचे फिर्यादी वरुण पेठ पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असुन हवा . अंबादास जाडर अधिक तपास करीत आहेत .
Edited by : Ratnadeep Ranshoor