संबंधित माहिती
- Mammootty Sister Death: सुपरस्टार मामुटीवर दु:खाचा डोंगर
- Air Hostess Murder हवाई सुंदरीची निर्घृण हत्या
- Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रत्येक भावाने आपल्या बहिणीसाठी या पाच गोष्टी करा
- Raksha Bandhan 2023: या मंदिरात भाऊ-बहिणीला प्रवेश निषिद्ध आहे, चुकून जाऊ नका
- Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
संकटात सापडलेल्या बहिणीला मदतीचा हात!
मुंबई : परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने जीएसटी थकविल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्याच्या अध्यक्ष तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असून, कारखानाही संकटाच्या गर्तेत रुतत चालला आहे. अशा स्थितीत या कारखान्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी बंधू तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे मदतीचा हात देण्यासाठी सरसावले आहेत. या कारखान्याला मदत करण्याकरिता खुद्द धनंजय मुंडे हेच राज्य सरकारकडे मदतीचा प्रस्ताव सादर करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा कारभार खुद्द पंकजा मुंडे पाहतात. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट घडवली गेली आणि पुन्हा हा कारखाना पंकजा मुंडे यांच्या ताब्यात दिला गेला. परंतु हा कारखाना बंद असल्याने आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात साखरेवरील जीएसटी थकविल्याच्या कारणावरून जीएसटी आयुक्तालयाने धडक कारवाई केली. त्यावरून पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले. कारण पंकजा मुंडे या राज्यातील राजकीय उलथापालथ, त्यात भाजपला मिळालेले नवे मित्र आणि त्यातून बदललेली राजकीय समीकरणे यावरून नाराज आहेत.
त्यामुळे त्या वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाई केली गेली असल्याचा आरोप पंकजा मुंडे समर्थक करीत आहेत. तसेच विरोधकांनीही याच मुद्यावरून भाजपला लक्ष्य केले आहे. दरम्यान, एकीकडे माजी मंत्री पंकजा मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न होत असतानाच त्यांचेच एकेकाळचे कट्टर विरोधक राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे बहिणीच्या मदतीला धावून जाणार असल्याचे समजते. त्यांच्यासह कारखान्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी धनंजय मुंडे यांनी हालचालीही सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी ते स्वत: आपल्या भगिनीशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
