सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (15:37 IST)

दापोलीत परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या घरावर हल्ला

pitai
दापोली तालुक्यातील देगाव-बौद्धवाडी येथील एका भंगार व्यावसायिकाच्या घरावर संतप्त सुमारे 40 ग्रामस्थांच्या जमावाने हल्ला करून त्याला गावातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्याच्या राहत्या घरासह टेम्पोची तोडफोड केली. जमीन वादातून शनिवारी दुपारी 2 वाजता घडलेल्या या प्रकारामुळे गावात प्रचंड तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
 
 दापोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, भंगार व्यावसायिक गंगासागर शुक्ला यांनी जुलै 2021 मध्ये देगाव येथे जमीन खरेदी केली असून या जमिनीत घराचे बांधकाम सुरू केले आहे. शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास गावातील सुमारे 40जणांचा जमाव बांधकाम केलेल्या भागात नासधूस करत असल्याचे सुजल मंडपे याने फोन करून सांगितले. यामुळे शुक्ला हे पाहण्यासाठी तत्काळ आपल्या जागेकडे गेले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या दिनेश महाळुंगकर व रवींद्र भोसले या दोघांनी सांगितले की, हाच तो भैय्या असे म्हणून शिवीगाळ सुरू केली.

याच वेळी शुक्ला यांच्यासह त्याची पत्नी आणि घरमालक मुकुंद मंडपे यांना प्रदीप भोसले, रमाकांत शिंदे, गुरुनाथ मांडवकर, रवींद्र भोसले, रुपेश बामणे, सुरेश करंजकर, विकास बाईत यांनी शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी प्रभाकर गोलांबडे, गंगाराम बाईत, नागेश जाधव, दिलीप जाधव, अनंत जाधव, अनुराधा भोसले, शानू पाथरकर, सुनील सभीगण, अशोक कदम, चंद्रकांत बामणे व अन्य सुमारे 20जण (सर्व रा. देगाव) घटनास्थळी जमा झाले व त्यांनीही काठय़ा व हाताच्या सहाय्याने शुक्ला यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी शुक्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दापोली पोलीस स्थानकात भादंवि कलम 452, 435, 143, 147, 148, 149, 352, 323, 504, 506, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत.