आधार क्रमांक येणार सातबारा उताऱ्यावर
जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर संबधित मालकांच्या नावाबरोबरच आता त्यांचा आधार क्रमांक नोंदविण्यात येणार आहे. त्यासाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) संगणक प्रणाली तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सातबारा उताऱ्यावरील आधार नोंदीमुळे जमीन खरेदी-विक्रीमधील गैरव्यवहार रोखण्यास मदत होणार असून बनावट सातबारा उताऱ्याद्वारे फसवणुकीलाही आळा बसणार आहे.
पॅन कार्ड, बॅंक खाते, मोबाईल क्रमांक, गॅस कनेक्शन आदींसाठी आधार क्रमांक जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. त्याच धर्तीवर सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक नोंदविला जाणार आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याच्या भूमि अभिलेख विभागाकडून सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक नोंदविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात सुमारे 23 कोटींपेक्षा अधिक सातबारे उतारे आहेत.