शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मे 2019 (10:16 IST)

आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्यावतीने यवतमाळ येथे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा गावातील लोकांचे श्रमदान

पावसाच्या अनियमिततेने दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. गावांना पाणीदार बनविण्यासाठी लोकसहभागातून श्रमदान केले तरच दुष्काळावर मात शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
 
यवतमाळ तालुक्यातील रातचांदना येथे  श्रमदान करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) सविता चौधर, उपजिल्हाधिकारी (नरेगा) संगीता राठोड, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिका-यांसह उपस्थित सर्व अधिका-यांनी श्रमदान केले.
 
दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने यवतमाळ जिल्ह्यातील सहा तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, दुष्काळ आता नियमितच झाला आहे. या काळात टँकरची संख्या वाढते. आपल्या पुढच्या पिढीसाठी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये, यासाठी सर्वांनी जिद्दीने श्रमदान करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
 
यावेळी शेतकरी सुधाकर दोनोडे यांच्या शेतात बांधण्यात येत असलेल्या गॅबीअन बंधारासाठी सर्व अधिकारी व गावक-यांनी श्रमदान केले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून एकूण 298 गावे सहभागी झाली आहेत. यात दारव्हा तालुक्यातील 66 गावे, कळंब तालुक्यातील 52 गावे, घाटंजी तालुक्यातील 50, यवतमाळ तालुक्यातील 48, उमरखेड तालुक्यातील 42 आणि राळेगाव तालुक्यातील 40 गावांचा समावेश आहे.
 
तासलोट येथे बंधा-याची पाहणी : कळंब तालुक्यातील तासलोट येथे वनविभागाच्या जागेवर बांधण्यात आलेले दगडी बंधारे, गॅबियन बंधारे, सीसीटी आदी कामांची जिल्हाधिका-यांनी पाहणी केली. यावेळी अधिकारी व गावकरी उपस्थित होते.