शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जानेवारी 2024 (12:51 IST)

गौतमी पाटीलचा कार्यक्रमात अब्दुल सत्तारांची मंचावरूनच शिवीगाळ

Gautami Patil dacnce show
अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोडमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रेक्षकांनी कार्यक्रमात हुल्लडबाजी सुरु केली तेव्हा मंत्री अब्दुल सत्तार संतापले. स्टेजवर उभे राहून सत्तारांनी हुल्लहबाजांना झापत शिवीगाळ केली. तसेच शांत बसत नसणार्‍यांना लाठीचार्ज करा आणि जेलमध्ये टाका, असे आदेशही सत्तारांनी पोलिसांना दिले. 
 
पोलिसांना आदेश देत सत्तार म्हणाले की पाठीमागे उभ्या असलेल्या लोकांना इतकं मारा की त्यांच्या xxx ची हाडं तुटली पाहिजेत. अब्दुल सत्तार यांनी समोर उपस्थित लोकांना आक्षेपार्ह भाषेचा वापर करत चांगलेच झापले. आता या घटनेमुळे सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला.
 
अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड मतदार संघामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना बुधवारी येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली. कार्यक्रम सुरु झाल्यावर बसण्याच्या मुद्द्यावरुन वादावादी तर नंतर हुल्लडबाजी सुरु झाल्याने सत्तार यांनी स्टेजवरुन हुल्लडबाजांना चांगलाच दम भरला. मात्र आता त्यांनी वापरलेली खालच्या दर्जाची भाषा हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
 
अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्वीट केले की महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा ! मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील "गुंड" समजतात का ? सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम ? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला.