मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (16:11 IST)

अब्दुल सत्तार म्हणतात, ‘सुप्रिया सुळेंना मी दिलेल्या शिवीत काहीच वावगं नाही’

कृषी मंत्री अब्दुल सत्तार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. 50 खोक्यांबाबत प्रश्न विचारला असता मंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना अश्लिल शिवी दिली आहे.
 
एका चॅनेलच्या पत्रकाराने सत्तार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी 50 खोक्यांबाबत केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर बोलताना सत्तार यांनी ऑन कॅमेरा सुप्रिया सुळेंना अश्लिल शिवी दिली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सत्तार यांच्या बोलण्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.
 
औरंगाबादमध्ये लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली.
दरम्यान सत्तार यांना शिवीबाबत विचारलं असता ते म्हणाले, सुप्रिया सुळे यांना दिलेल्या शिवीबद्दल मला वावगं वाटत नाही, असं अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.
 
"माझा कोणताही कोणीही निषेध केला तरी मी त्यांना घाबरत नाही. जे आम्हाला खोक्यांची भाषा वापरतात त्यांची डोकी तपासी लागणार आहेत. हे XXXX लोकांना खोक्यांची सवय लागली आहे. या XXXX लोकांसारखी सवय नाही. मी आताही बोलतो. नंतरही बोलणार आणि सभेतही बोलणार," असं पुन्हा एकदा त्यांनी म्हटलं आहे.
ज्या भाषेत माझ्यावर टीका होईल त्याला मी त्याच भाषेत उत्तर देईल, असं सत्तार म्हणाले आहेत.
 
अब्दुल सत्तार यांचं घुमजाव
"मी कोणत्याही महिला भगिनीबद्दल अपशब्द बोललेलो नाही. जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याबद्दल मी बोललो. सुप्रिया सुळे आणि महिलांची मनं दुखावली जातील असं मी बोललो नाही. कोणत्याही महिला भगिनीला वाटत असेल तर मी त्याविषयी खेद व्यक्त करतो. पण मी असं काही बोललो नाही," असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणालेत.
 
ते पुढे म्हणाले, "त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. महिलांबद्दल मी एक शब्दही बोललो नाही. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आमचे सर्व आमदार महिलांचा सन्मान करतात. मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही उचकवण्याचा काम करू नका, आमच्यात भांडणं लावू नका. मी कोणत्याही महिला भगिनीबद्दल बोललो नाही. कुठल्याही महिलेचं मन दुखावलं गेलं असेल तर खेद व्यक्त करतो."
 
राष्ट्रवादी काँग्रेसचं अल्टिमेटम
यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सत्तार यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
 
"सत्तेचा माज आला आहे. मीही त्यांना चॅनेलच्या माध्यमातून एकेरी आणि अपशब्द वापरू शकतो, पण ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंना उद्देशून जो शब्द वापरला त्यातून वाह्यातपणा दिसतो. अब्दुल सत्तारांना आमचा अल्टीमेटम आहे. 24 तासात त्यांनी सुप्रिया सुळेंची माफी मागावी. अन्यथा त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही," असं मिटकरी म्हणाले आहेत.
 
"सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना वापरलेला शब्द समस्त महिला जातीचा अपमान आहे. सत्तारांना सत्तेचा उन्माद आला आहे. ही मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सत्तार यांना समज द्यावी. अन्यथा हे अधोगतीकडे जाण्याची शक्यता आहे. हे प्रकरण तापवू नये. एखाद्या स्त्रीबद्दल, संसदरत्न पुरस्काराने सन्मानित खासदारांप्रति असे शब्द वापरता कामा नये. त्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ", असं मिटकरी पुढे म्हणाले आहेत.
 
"स्त्रियांचा अवमान करणे, महिलांप्रति आक्षेपार्ह शब्द उच्चारणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुठल्याही नेत्याने अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये. 50 खोक्यांवरून जशी राळ उठवली गेली, अपमानित करण्यात आलं. त्याचं ते प्रत्युत्तर आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी महिलांप्रति आक्षेपार्ह उद्गार काढू नयेत", असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितलंय.

तर "मी हे वक्तव्य पाहिलेलं नाही. कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही नेत्याने-कार्यकत्याने महिलांबाबत असं बोलू नये. आदरयुक्त भाषेत टीका करायला हवी. राजकारणाची पातळी घसरणार नाही याची काळजी घ्यायला हवी. पातळी घसरत असेल तर ते चुकीचं आहे", असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
 
Published By- Priya Dixit