राज्याच्या कारागृहांतील सुमारे ९०० कैदी फरार..!
तुरुंगातील कैद्यांनी पुन्हा कायदा मोडला आहे. कोरोना काळात ४,२४१ कैद्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुट्टी देण्यात आली होती. आता दिलेल्या सुटीची मुदत संपली मात्र ४,२४१ कैद्यांपैकी ३,३४० कैदीच पुन्हा कारागृहात परतले आहेत. बाकीच्या कैद्यांचा कुठे पत्ताच लागेना. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. जे कैदी परतले नाहीत त्यात काहींना जन्मठेपेची तर काहींवर अतिगंभीर गुन्ह्यांची शिक्षा आहे. त्यामुळे आता जे कैदी परतले नाहीत त्या कैद्यांवर फरार घोषित करण्याची प्रक्रिया कारागृह प्रशासन करत आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली ती सर्वत्र पसरू लागली, या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत होता. दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रभाव अत्यंत जहाल होता. कोरोनाचा प्रादुर्भाव देशभर प्रचंड वेगाने वाढत होता. कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा कैद्यांची संख्या जास्त होती. कोरोनाचा संसर्ग कारागृहात पोहचू नये व संसर्ग वाढू नये त्यामुळे खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीत कारागृहातील कैद्यांना कोरोना अभिवचन देण्यात निर्णय देण्यात आला होता. या आदेशानुसार राज्यातील कारागृहात बंदिस्त कैद्यांना सुट्टी देण्याबाबत एक समिती स्थापन केली गेली. सर्व तरतुदीनुसार आणि विहित अटी व शर्ती लावून कैद्यांना सुरुवातीला सुमारे ४५ दिवस एवढ्या कालावधीची सुटी जाहीर करण्यात आली. ह्या कालावधी नंतर साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत ८ मे २०२० रोजीची अधिसूचना रद्द करेपर्यंत ३० दिवसांच्या प्रमाणामध्ये त्यात वाढ करण्यात आली होती. मात्र हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली. कोरोनाचा प्रादुर्भाव सरत असताना शासनाने सर्व निर्बंध हटवले. त्यामुळे १० फेब्रुवारी २०२२ रोजी कैद्यांची सुट्टीची अधिसूचना रद्द करण्यात आली. रजेवर गेलेले सर्व कैद्यांना तात्काळ कारागृहात परतण्याचे परिपत्रकाद्वारे आदेश काढण्यात आले. कारागृहात परतताना त्या कैद्यांना कोरोना चाचणीचे ही बंधन होते. पण सुट्टीवर गेलेल्या कैद्यांपैकी फक्त ३,३४० कैदी पुन्हा कारागृहात परतले आहेत. उर्वरित कैदी पुन्हा परतलेच नाही. त्याचा आता कुठे पत्ताही लागेना. त्यामुळे कारागृह प्रशासन या उर्वरित सर्व कैद्यांना फरार घोषित करण्याचा प्रक्रियेत असून संबंधित पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम देखील सुरू आहे.
कारागृह व त्यातील फरार कैद्यांची संख्या
औरंगाबाद :- २०७
अमरावती :- १२९
नाशिक :-१२७
तळोजा :- १२१
पैठण :- ७१
नागपूर :- ७१
येरवडा :- ३२
मुंबई :- १४