1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2022 (16:27 IST)

आमदार जयकुमार गोरेंचा अपघात, गाडी पुलावरून नदीत कोसळली

साताऱ्यातील माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. पुणे-पंढरपूर मार्गावर फलटणजवळ त्यांच्या फॉर्च्युनर गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे गाडी पुलावरून थेट 30 फूट नदीत कोसळली.
आमदार जयकुमार गोरे सुखरूप आहेत. त्यांच्या तब्येतीला कुठलाही धोका नाही आणि आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं.
 
गोरे यांच्या बरोबर असलेल्या आणि प्रकृती गंभीर असलेल्या दोघांना बारामतीच्या भोईटे रुग्णालयात नेण्यात आलं आहे अशी माहिती सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार दुसरी कुठली गाडी त्यावेळी रस्त्यावर आजूबाजूला नव्हती. त्यामुळे चालकाच्या चुकीमुळे गाडी खाली गेली असावी असा अंदाज आहे असं त्यांनी सांगितलं.
 
यावेळी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह 4 जण जखमी झाले. पहाटे 3.30च्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. नदीवरच्या पुलाला लावलेल्या तारा भेदून गाडी खाली कोसळली.
जयकुमार मुंबईहून आपल्या गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला. त्यांच्यावर पुण्यातल्या रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत.
 
“जयकुमार यांच्या पायाला आणि बरगडीला फ्रॅक्चर झालं आहे. शरीराच्या अन्य कुठल्या भागाला दुखापत झाली आहे का यावर डॉक्टरांचं लक्ष आहे. असंख्य कार्यकर्ते जयकुमार यांना भेटायला आले आहेत. मी त्यांच्या भावना समजू शकते. पण सध्या त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. आपण डॉक्टरांना सहकार्य करुया”, असं त्यांच्या पत्नी सोनिया गोरे यांनी म्हटलं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णालयात जाऊन गोरे यांची भेट घेतली. ते म्हणाले, “काल अधिवेशन संपल्यावर आम्ही सर्वजण पुण्यात आलो. त्यानंतर आमदार जयकुमार गोरे रात्री पुण्याहून फलटणला निघाले. फलटणजवळ चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पुलाचे कठडे तोडून जवळपास ६० फूट खाली कोसळली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने येऊन मदतकार्य केलं.”
 
आमदार गोरे यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
दरम्यान गोरे यांच्या गाडीच्या एअरबॅग्ज उघडल्या नाहीत अशी चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात सावंत यांना विचारलं असता ते म्हणाले, “गाडीबाबत मी माहिती घेतली नाही. मी केवळ आमदार जयकुमार गोरे यांच्या आरोग्याविषयी बोलेन”.
 
“मी आमदार गोरेंशी चर्चा केली. ते स्वतः माझ्याशी बोलले. त्यांची तब्येत चांगली असल्याने त्यांना कोणताही धोका नाही. पुढील पाच ते सहा दिवसात ते आयसीयूतून बाहेर येतील असं त्यांनी सांगितलं”, असं त्यांनी सांगितलं.

Published By- Priya Dixit