पोलिसांवर हल्ला करणा-या आरोपीस न्यायालयाने सुनावली तीन महिने कारावासाची शिक्षा
शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस तीन महिने सश्रम कारावास आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विनोद निवृत्ती आगळे (४० रा.आगळे चाळ,रामालयम हॉस्पिटल जवळ, नाशिक ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २०१८ मध्ये पंचवटी कारंजा भागात पोलिसावर हल्ला करून हाताच्या करंगळीस त्याने मोठी दुखापत केली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालिन सहाय्यक निरीक्षक व्ही.डी.शार्दुल यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले त्यानंतर न्या. आर.आर.राठी यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
सरकार तर्फे अॅड. योगेश कापसे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस भादवी कलम ३५३ व ३३२ अन्वये वेगवेगळी तीन महिने साधा कारवास व प्रत्येकी पाचशे रूपये दंडाची तर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ अन्वये तीन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली.या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, २८ नोव्हेंबर २०१८ रोजी इंदिरा गांधी हॉस्पिटल समोरील महापालिका शाळा क्रं.१० च्या आवारात एक जण चॉपर घेवून फिरत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस नाईक माधव शंकर सांगळे व आहेर नामक कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन दहशत माजविणा-या आरोपीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपी आगळे यांनी पोलिसांना शिवीगाळ व झटापट करुन पोलिस सांगळे यांच्यावर चॉपरने वार केला. या घटनेत सांगळे यांच्या हाताच्या करंगळीस मोठी दुखापत झाली होती.